धरणगाव (प्रतिनिधी) – येथे कापूस खरेदी केंद्राचे उदघाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते झाले. सरकार अडचणीत असूनही कापसाची शासकीय खरेदी सुरू असून एकही शेतकरी कापूस मोजणीपासून वंचित राहणार नाही. असे त्यांनी सांगितले.

धरणगाव येथील कृष्णा कॉटन व एस. के. कॉटन जिंनीग प्रेसिंग मिल मध्ये शासकीय कापूस खरेदी केंद्राचा शुभारंभ पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे नेते डी. जी. पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, राष्ट्रवादीचे नेते तथा पणन महासंघाचे संचालक संजय पवार, पंचायत समिती सभापती मुकुंद नन्नवरे, जि. प. सदस्य गोपाल चौधरी, आशिष गुजराथी, शेतकी संघाचे अध्यक्ष पाटील, तहसीलदार देवरे, सहाय्यक उपनिबंधक बारी, गजानन पाटील, मच्छींद्र पाटील, माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, नगरसेवक पप्पू भावे, राजेंद्र महाजन, रमेश पाटील, जीवन बयास, प्रेमराज पाटील, भानुदास विसावे, राहुल पारीख, मूर्तिजा बोहरी यांच्यासह जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, कोरोनामुळे अनेक अडचणी असल्या तरी सरकारने कापूस खरेदी सुरू केली आहे. धरणगाव येथे कापूस खरेदी केंद्र सुरु झाल्यामुळे आपल्या भागातील शेतकर्यांना याचा फायदा होणार आहे. कापूस उत्पादक शेतकर्याच्या कापसाला चांगला भाव मिळून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर शेतकर्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही, व कापसाची शासकीय खरेदी सुरू असून एकही शेतकरी कापूस मोजणीपासून वंचित राहणार नसल्याची ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली. धरणगाव येथे औद्योगिक वसाहत स्थापन करण्यासाठी आपला पाठपुरावा सुरू असून याबाबत बैठक घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.







