पूर्ववैमनस्यातून घटना झाल्याची शक्यता

चाळीसगाव (प्रतिनिधी) – शहरातील घाट रोड परिसरातील हुडको परिसरात रजानगर भागातील रहिवासी तरुण शेख मोहंमद साबीर मोहंमद गालीन उर्फ जुबेर उर्फ बंबीया याच्यावर शनिवारी २८ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्यामुळे तो गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. ही घटना पूर्ववैमनस्यातून झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

चाळीसगाव येथील घाट रोड परिसरातील हुडको भागात दुपारी चार वाजेच्या सुमारास शेख मोहंमद साबीर हा त्याच्या मित्रांसोबत गप्पा मारत बसला होता. त्यावेळी अज्ञात दोन व्यक्तींनी यामाहा दुचाकीवर येऊन अचानक गोळीबार केला. यात दोन गोळ्या झाडल्या गेल्या असून एक गोळी हवेत फायर झाली, एक गोळी शेख मोहंमद साबीर मोहंमद गालीन उर्फ जुबेर या तरुणास लागली. हि गोळी डाव्या मांडीला लागली असून खिशातील नोटांमधून देखील गोळी आर-पार झाली आहे.

गोळीबाराची पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर तात्काळ चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड व त्यांच्या पथकाने घटनास्थळावर जाऊन पाहणी केली. दरम्यान जखमी जुबेर यास पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी रुग्णालयात जाऊन जखमी कडून माहिती जाणून घेतली. जखमीने हैदर अली या संशयिताचे नाव सांगितले असून त्याच्या सांगण्यावरून हल्लेखोरांनी हल्ला केल्याचे त्याचे म्हणणे आहे. हैदर अली हा सध्या जळगाव कारागृहात असल्याची माहिती उप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे यांनी दिली.
हल्लेखोरांची पोलीस माहिती घेत आहेत. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे, पोलीस उपअधीक्षक कैलास गावडे यांनी देखील भेट देऊन माहिती घेतली आहे. भरदिवसा चाळीसगाव शहरातील गजबजलेल्या वस्तीत घडलेल्या या प्रकाराने शहरातील वातावरण भितीदायक झाले असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान चाळीसगाव शहरात गोळीबाराची दुसरी घटना असल्याची माहिती मिळत असून पहिली घटना नागद रोड परिसरात घडल्याचे कळाले आहे.







