मंत्री अँड. यशोमती ठाकूर यांचा कॉंग्रेसमध्ये प्राण फुंकण्याचा प्रयत्न
जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक कॉंग्रेस कार्यकर्त्याने मरगळ झटकावी. संघटीत व्हा. संघर्ष करा. पक्षवाढीसाठी कामाला लागा. यश मिळेलच, अशा शब्दात महिला व बालकल्याण मंत्री अँड. यशोमती ठाकूर यांनी कॉंग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून कॉंग्रेसमध्ये प्राण फुंकण्याचा प्रयत्न केला. त्या शुक्रवारी २७ रोजी जिल्हा कॉंग्रेस भवनात पक्ष बैठकीला आल्या असता बोलत होत्या.
यावेळी मंचावर जिल्हाध्यक्ष अँड. संदीप पाटील, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, आ. शिरीष चौधरी, अविनाश भालेराव, डी.जी.पाटील, देवेंद्र मराठे, हितेश पाटील, सरचिटणीस जमील शेख, जिल्हा परिषद सदस्य व गटनेते प्रभाकर सोनवणे आदी उपस्थित होते. यावेळी विविध बचत गटाच्या महिलांचा आणि उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी अँड. यशोमती ठाकूर म्हणाल्या की, तुम्ही ठरवा, तुम्ही काय करावे. ठरविले तर तुम्ही जिल्हा कॉंग्रेसमय करू शकतात. मनपात, जिल्हा परिषदेत, विधानसभेत, ग्रामपंचायतीत कॉंग्रेसच्या किती जागा आहेत याचे आत्मपरीक्षण करा, प्रत्येकाने स्वत:चा आदर करावा. स्वत:ला कमी लेखू नका असे सांगत त्यांनी एकीकडे कोरोना वाढतोय, तुम्ही घंट्या वाजवायला सांगताय ? अशा शब्दात मोदी सरकारचा समाचार घेतला.
कॉंग्रेस कार्यकर्त्याना मार्गदर्शन करताना ते पुढे म्हणाले की, निवडणूक झाली की घरी बसा असे होता कामा नये. महिला सुरक्षेचा प्रश्न आहे तर अत्याचार थांबवायला प्रयत्न करा. आरोग्य समित्या स्थापन करून वैद्यकीय सेवा देण्याचा प्रयत्न करा. आपण राज्यातील महाविकास आघाडीचे घटक आहोत. त्यामुळे १०० टक्के देण्याचा प्रयत्न करावा. देशाचे संविधान एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करा. जातीयवादी लोकांकडून संविधान बदलण्याची भाषा होते, आपण त्याचा प्रचार केला पाहिजे. २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनाचा कार्यक्रम आपण करायला हवा होता. हतबलता मला आवडत नाही, हतबल राहू नका, अशा शब्दातही कानउघाडणी करीत त्यांनी कॉंग्रेसची, संविधानाची विचारधारा जागृत ठेवा असेही त्यांनी आवाहन केले.