अवयवदान दिनानिमित्त जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
जळगाव (प्रतिनिधी) – राष्ट्रीय अवयवदान दिन म्हणून २७ नोव्हेंबर हा संपूर्ण देशात साजरा केला जातो. त्यानिमित्त छाया किडनी केअर व रिलीफ फाउंडेशन, सुखकर्ता फाउंडेशन, आनंद डायलेसिस सेंटर जळगाव, आर्या फाउंडेशन ह्यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कक्षात आयोजित कार्यक्रमात अवयवदान चळवळीसाठी पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याहस्ते नीलिमा अहिरराव आणि विमल जोशी ह्या किडनी दात्यांना सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. आपल्या शरीरातील अवयव जिवंतपणी दान करून कुटुंबातील प्रिय व्यक्तीला पुनर्जन्म देणाऱ्या ह्या दोघी महिलांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे मत जिल्हाधिकारी यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या ” अवयवदान प्रतीज्ञा ” प्रतिमेचे ” विमोचन ह्या विशेष दिनाच्या प्रसंगी जिल्हाधिकारी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. सुखकर्ता फाउंडेशनचे डॉ. नरेंद्र ठाकूर यांनी सर्व शासकीय कार्यालयात या प्रतिमा आगामी काळात लावणार असल्याचा मनोदय व्यक्त केला.या प्रसंगी छाया किडनी केअर व रिलीफ फाउंडेशनचे किशोर सूर्यवंशी व आनंद डायलेसिस सेंटरचे डॉ. अमित भंगाळे, आर्या फाउंडेशनचे डॉ. धर्मेंद्र पाटील ह्यांनी अवयवदान मोहिमेस गती येण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे निवेदन सादर केले. त्यात जिल्हा स्तरावर अवयवदान समिती स्थापन व्हावी, शहरातील सर्व क्रिटिकल केअर सेंटरमध्ये मेंदू मृत जाहीर करण्यासाठी समिती कार्यान्वित होण्यासाठी निर्देश देणे, मेंदूमृत झालेल्या रुग्णाचे अवयव काढण्यासाठी परवानगी शहरातील अद्यायवत रुग्णालयास मिळावी, विभागीय अववाय प्रत्यारोपण समितेचे उपकेंद्र जळगावात व्हावे, अवयवदान संकल्पपत्र भरण्याची सुविधा सर्व वैद्यकीय महाविद्यालय, ग्रामीण रुग्णालय येथे करण्यात यावी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात देहदानाची सुविधा सध्या उपलब्ध झाल्यामुळे त्याबाबत जनजागृती करण्याबाबत नमूद करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी या सर्व बाबींवर सकारात्मक प्रतिसाद देत प्रशासन व सामाजिक संस्था एकत्रितपणे या मोहिमेस गती देण्याचे कार्य नक्की करतील अशी आशा व्यक्त करून अवयवदान मोहिमेस शुभेच्छा दिल्या. मुसा शेख, छाया किडनी केअर व रिलीफ फाउंडेशन यांनी आभार मानले.