अप्पर पोलीस महासंचालकांच्या पत्राला कारागृह अधीक्षकांचे उत्तर
जळगाव (प्रतिनिधी) – येथील जिल्हा कारागृहात कैदी रवींद्र उर्फ चिन्या जगताप याच्या मृत्युप्रकरणी विधानसभेत उपस्थित होणाऱ्या तारांकित प्रश्नाला कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांनी वरिष्ठांना उत्तर पाठविले आहे.
विधानसभेत येत्या हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न क्रमांक १५५५४ द्वारे रविंद्र जगताप मृत्यू प्रकरणाचे लक्ष वेधण्यात आले आहे. त्याचा संदर्भ देत गृह विभागाच्या कार्यासन अधिकारी राखी चव्हाण यांनी अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक (कारागृह व सुधारसेवा) यांना १९ नोव्हेंबर रोजी पत्र दिले होते. त्यात म्हटले की, रविंद्र उर्फ चिन्या जगतापचा मृत्यू झाल्याप्रकरणी त्याच्या पत्नीचा जबाब नशिराबाद पोलिसांनी २९ सप्टेंबर २०२० रोजी नोंदविला हे खरे आहे काय, असल्यास त्यांच्या पत्नीने कारागृह अधीक्षक व इतर अधिकाऱ्यांविरुद्ध खुनाचा व पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे, हे हि खरे काय, असल्यास यात चौकशी करण्यात आली काय, असल्यास चौकशीच्या अनुषंगाने दोषीवर शासनाने कोणती कारवाई केली वा करीत आहे, नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ? या प्रश्नांच्या अनुषंगाने अप्पर पोलीस महासंचालकांनी जळगाव कारागृह अधीक्षकांना पत्र देऊन माहिती मागितली होती.
त्यात कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांनी अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक यांना पत्राद्वारे माहिती दिली आहे. त्यात मयताच्या पत्नीने कारागृह अधीक्षक व इतर अधिकाऱ्यांविरुद्ध खुनाचा व पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी जळगाव जिल्हा कारागृह कार्यालयास केलेली नाही. तसेच याबाबत डीआयजी औरंगाबाद यांच्या पत्रानुसार धुळे जिल्हा कारागृह अधीक्षक डी.जी.गावडे यांनी सदर मृत्यू प्रकरणाची चौकशी जळगाव कारागृहास येऊन पूर्ण केलेली आहे, अशी माहिती २३ नोव्हेंबर रोजी दिलेली आहे. मात्र या प्रकरणात कारागृह प्रशासनाला वाचविण्याचा प्रयत्न होत असल्याचे बोलले जात आहे.







