चंदीगड (वृत्तसंस्था) – राजधानी दिल्लीतील गंभीर स्थिती आणि कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता पंजाब सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. पंजाबमध्ये रात्रीच्या वेळी संचारबंदीचा आदेश मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी दिला आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार 1 डिसेंबरपासून पंजाबमधील सर्व विभाग आणि शहरांमध्ये रात्रीच्या वेळी संचारबंदी लागू करण्यात येईल. सोबतच मास्क न वापरणारे आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
दिल्लीमध्ये कोरोनाची स्थिती गंभीर झाली आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. पंजाबमध्येही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं संकट उभं राहिलं आहे. त्यामुळे अमरिंदर सिंग यांनी कडक धोरण अंवलंबण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार रात्रीच्यवेळी संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच हॉटेल, रेस्टॉरंट्स, बार रात्री 9.30 वाजेपर्यंतच सुरु ठेवता येणार आहेत. तर संचारबंदी रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत लागू राहणार आहे. दुसरीकडे मास्क न वापरणाऱ्यांकडून आता 500 रुपयांऐवजी 1000 रुपये दंडाची वसूली केली जाणार आहे.