मुंबई (वृत्तसंस्था) – शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर सक्तवसुली संचलनालयाकडून मंगळवारी सकाळी छापे मारले. टॉप्स कंपनी समूहाविरोधातील आर्थिक गैरव्यवहाराच्या गुन्ह्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. यानंतर त्यांचा मुलगा विहंग याला ताब्यात घेत जवळपास सहा तास चौकशी केली. यानंतर ईडीने प्रताप सरनाईकांना समन्स बजावले असून आज सकाळी 11 वाजता चौकशीला ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. मात्र, ईडीचे पथक जेव्हा सरनाईकांच्या घरी आले, तेव्हा त्यांनी नाष्टा आणि जेवण केल्याचा खुलासा प्रताप सरनाईकांनी केला आहे.
एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना प्रताप सरनाईक म्हणाले की, माझ्या तसंच मुलांच्या घरी आणि ऑफिसात गेल्यानंतर ईडीच्या लोकांनी मस्त नाश्ता केला. जेवण केलं. तसेच चार- पाच वेळा चहा देखील घेतला. ईडीच्या लोकांचं माझी पत्नी, मुलं आणि सुनांनी चांगलं स्वागत केल्याचा खुलासा प्रताप सरनाईकांनी केला आहे. घरात पाहुणे आल्यानंतर स्वागत कसं करायचं हे सरनाईक कुटुंबाला चांगलं माहिती असल्याचे देखील प्रताप सरनाईक यांनी यावेळी सांगितले.
प्रताप सरनाईक पुढे म्हणाले की, ईडीचे लोक माझ्या मुलांना तुमचे वडील कंगना, अर्णब, अन्वय नाईक प्रकरणावर खूप बोलत असल्याचं विचारत होते असं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं आहे. मात्र देशात, राज्यात महाराष्ट्राची, मुंबई पोलिसांची बदनामी होत असेल तर अशा गोष्टींवर प्रताप सरनाईक बोलणार. प्रताप सरनाईकचं तोंड ईडीची धाड पडली म्हणून बंद होणार नाही, असं स्पष्टीकरण प्रताप सरनाईक यांनी दिलं.
दरम्यान, शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी गेल्या काही दिवसांत अभिनेत्री कंगना रानौत व पत्रकार अर्णब गोस्वामी या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर थेट टीकास्त्र सोडणाऱ्या दोघांविरुद्ध अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला होता. मंत्रिपदाने हुलकावणी दिल्यावर पक्षाने सोपविलेली प्रवक्तेपदाची जबाबदारी सरनाईक यांनी तडफेने पार पाडली. लागलीच ईडीचा ससेमिरा त्यांच्या पाठी लागला. आता या लढाईत सरनाईक यांची शिवसेना नेतृत्व पाठराखण करणार का? व सरनाईक यांना त्यांच्या लढवय्या पवित्र्याची राजकीय बक्षिशी मिळणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे.







