मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जनतेला आवाहन

मुंबई (वृत्तसंस्था) – “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” या मोहिमेतून चांगला प्रतिसाद मिळाला असून राज्याच्या आरोग्याचा नकाशा तयार होत आहे. कोरोना अजूनही गेलेला नाही. दिवाळी सणाच्या काळात झालेली गर्दी पाहता कोरोना रुग्ण आणखी वाढू शकतात. नागरिकांनी मास्क घालणे, हात धुणे, शारीरिक अंतर राखणे हे नियम पाळावेत असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला उद्देशून केले.
जनतेशी संवाद साधताना रविवारी २२ रोजी सोशल मीडियाद्वारे ते बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “आपण सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळं उघडली आहेत. मात्र गर्दी करू नका. चार दिवसांवर कार्तिकी वारी येत आहे. कार्तिकीची वारी साधेपणाने पार पाडा. गर्दी न करता सण-उत्सव साजरे करा. कोरोनाचं संकट टळलेलं नाही, तरुणांनो सावध राहा. येणारी लाट आधीच्या लाटेपेक्षा अधिक उग्र असू शकते. सुमारे २५ कोटी जनतेला आपल्याला लसीकरण करावं लागणार आहे. एकदा डोस दिला, तर पुन्हा बुस्टर डोस द्यावे लागणार आहे. डोस दिल्यावर रुग्णाला कोणत्या तापमानात ठेवायचं हे सर्व अधांतरी आहे. त्यामुळे मास्क घालणे, हात धुणे, शारीरिक अंतर राखणे ही त्रिसूत्री पाळावीच लागणार आहे.
प्रदूषणमुक्त दिवाळीसाठी सहकार्य केल्याबद्दल आभार मानत कोरोनावर काहीसे नियंत्रण मिळविण्यात यश आले असल्याचे सांगितले. काही नागरिकांवर नाराजी व्यक्त करीत मुख्यमंत्री म्हणाले की, मी तुमच्यावर नाराज आहे. अनेक लोक मास्क न घालता फिरत आहे. गर्दी करत आहेत. आपण शाळा उघडू शकलो नाही. निर्णय घेतला पण उघडू शकलो नाही, कारण प्रश्नांकित आहे. उद्या मुलं आजारी पडू नये याची काळजी आहे. काहीजण म्हणतात हे उघडा, ते उघडा, मात्र ते या महाराष्ट्राची जबाबदारी घेणार आहेत का?” असाही सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला.







