राजस्व अभियानांतर्गत महसूल विभाग, आदिवासी एकता संघर्ष समितीतर्फे उपक्रम

अमळनेर (प्रतिनिधी) – राजस्व अभियानांतर्गत दि. २१ नोव्हेंबर रोजी तालुक्यातील मारवड, गोवर्धन, बोरगाव येथील आदिवासी कुटूंबाना शिधापत्रिका वाटप करण्यात आल्या.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात बेरोजगारी आणि आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. असंख्य आदिवासी कुटुंबे यामुळे बेरोजगार झाले असून या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने सर्व आदिवासी कष्टकरी व शेतकरी शेतमजुरांना २ रुपये किलो दराने धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आदिवासींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सर्व आवश्यक लाभ आदिवासीं पर्यंत पोहचविण्यासाठी आणि खावटी योजनेसाठी आवश्यक असलेले शिधा पत्रिका बहुतेकांकडे नसल्याचे निदर्शनास आले होते. या अनुषंगाने आदिवासी एकता संघर्ष समितीच्या प्रदेशाध्यक्षा प्रा. जयश्री दाभाडे यांनी तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांच्याशी चर्चा करत आदिवासी कुटुंबाना रेशनकार्ड उपलब्ध करून देण्याबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सर्व आदिवासी कुटुंबाना रेशनकार्ड उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले होते. या अनुषंगाने महसूल विभाग आणि आदिवासी एकता संघर्ष समितीतर्फे पहिल्या टप्प्यात अनेक गावांना रेशनकार्ड अर्ज वाटप करण्यात आले. हे अर्ज मोफत उपलब्ध करून देण्यात आले होते. या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात मारवड, गोवर्धन, बोरगाव येथील आदिवासी कुटूंबाना रेशनकार्ड वाटप तहसीलदार मिलिंद कुमार वाघ, प्रा. जयश्री दाभाडे व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अगोदर जवळपास ३०० ते ४०० रेशनकार्ड वाटप झाले असून त्यात रुबजीनगर, खेडी व्यवहारदळे, रामेश्वर खु, रामेश्वर बु, इ गावांचा समावेश आहे. यावेळी तहसीलदार मिलिंदकुमार वाघ,आदिवासी एकता संघर्ष समिती च्या प्रदेशाध्यक्षा प्रा जयश्री दाभाडे, पत्रकार डॉ विलास पाटील, बावणे रावसाहेब, ना. गो.पाटील, मारवड उपसरपंच बी.डी. पाटील, विकासो चेअरमन शांताराम चौधरी, नरेंद्र पाटील गोवर्धन, तलाठी भावसार आप्पा, अनिल पवार गोवर्धन, अनिल साळुंखे, निंबा साळुंखे, सुभाष पाटील,धनराज पारधी, अनिल पारधी, मनोज पवार, पुनमचंद पारधी, श्रीकांत साळुंखे आदीसह गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.







