जळगाव (प्रतिनिधी) – कानळदा रोडजवळ विनापरवाना अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या डंपरवर एलसीबीने कारवाई करत चालकास अटक केली आहे. शहर पोलीस ठाण्यात चालक व डंपर मालकाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. वाळूचा डंपर शहर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आलाय.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी, जळगाव शहरात बेकायदेशीर वाळूची वाहतूक सुरू असल्याने पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्या आदेशानुसार मध्यरात्री वेगवेगळ्या ठिकाणी पोलीसांची गस्त वाढविली आहे. शहरातील गेंदालाल मिल, शिवाजी नगर आणि कानळदा रोड टी पॉईटजवळ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हेडकॉन्स्टेबल दादाभाऊ पाटील, परेश महाजन, भगवान पाटील, पंकज शिंदे हे शनिवारी रात्री ११ ते १२ वाजेच्या दरम्यान वाहनांची तपासणी करत होते. ११ वाजून ५० मिनीटांनी डंपर (क्रमांक एमएच १९ एक्स ६७७१) मध्ये बेकायदेशीर वाळूची वाहतूक करत असल्याचे दिसून आले. डंपर थांबवून वाळू वाहतूकीचे परवाना नसल्याने डंपर चालक शेख मोहसीन शेख चिराग (वय-२५) रा. आव्हाणे, ता.जि.जळगाव याला अटक केली. डंपर शहर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला. पो.कॉ. परेश महाजन यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात डंपरचालक शेख मोहसीन आणि डंपर मालक रावसाहेब चौधरी (पुर्ण नाव माहिती नाही) यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पो.ना. नितीन अत्तरदे करीत आहे.







