रतनलाल बाफना यांना श्रद्धांजलीचा रविवारी कार्यक्रम

जळगाव (प्रतिनिधी) – सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक, गो – प्रेमी स्व. रतनलाल बाफना यांना श्रद्धांजलीसाठी उद्या (दि. २२) संभाजी राजे नाट्यसंकुलात आयोजित भावपुष्प कार्यक्रमासाठी आज शनिवारी दि. २१ रोजी संपूर्ण बैठक व्यवस्था आणि इमारतीचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. कोरोना महामारीच्या प्रभावाची शक्यता लक्षात घेऊन उद्याचा कार्यक्रम सर्व प्रकाराचे नियम पाळून होणार आहे.
भावपुष्प कार्यक्रमासाठी नाट्यगृहात सायंकाळी ५.४५ वाजता स्थानापन्न होणे आवश्यक आहे. सभागृहातील निम्म्याच खुर्च्यांचा वापर केला जाणार आहे. एक खूर्ची सोडून बैठक व्यवस्था असेल. इतर खुर्च्या टैग लावून बंद केलेल्या असतील. सभागृहात प्रवेशापूर्वी हातांवर सेनिटायझर फवारणी होईल. शिवाय मास्क घातलेल्या व्यक्तिंनाच प्रवेश दिला जाईल.
स्व. रतनलालजी हे वेळेचे पालन करण्याबाबत आग्रही असत. त्यामुळे उद्या कार्यक्रम वेळेवर सुरू करुन अवघ्या ९० मिनिटात आटोपशीर करण्यासाठी आयोजकांचा प्रयत्न आहे. यासाठी मान्यवर उपस्थितांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे. श्रद्धांजलीपर व्याख्याने ही केवळ ३ मिनिटांची असतील. काही मान्यवरांचे ऑडिओ व्हिज्युअल संदेश असतील. स्व. रतनलालजींचे कार्य दाखविणाऱ्या चित्रफित असतील. स्व. रतनलालजी यांच्याविषयी जळगावकरांची कृतज्ञता दर्शविण्यासाठी हा सर्व समावेशक कार्यक्रम स्व. रतनलालजी बाफना स्नेहीजनांनी आयोजित केलेला आहे.







