आमदारांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांचा निर्णय

पारोळा (प्रतिनिधी) – कोरोना विषाणूची संभाव्य दुसरी लाट येऊ नये म्हणुन आ. चिमणराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पारोळा तहसिल कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आलेली होती. या बैठकीत सर्वानुमते सोमवारी २३ नोव्हेबर रोजी जनता कर्फ्युचे आयोजन व मास्क न वापरणाऱ्यांवर २०० रूपये दंड आकारण्यात यावा असे निर्णय घेण्यात आले.
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव पुन्हा वाढु नये म्हणुन मास्क वापरणे, सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे, मास्क न घालणाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही करणे, व्यापाऱ्यांनी मास्क न घालणाऱ्यांना दुकानात प्रवेश देवु नये अशा ठोस उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. यावेळी प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसिलदार अनिल गवांदे, पोलीस निरिक्षक लिलाधर कानडे, वैद्यकीय अधिक्षक योगेश साळुंखे, उपकेंद्र अधिक्षक प्रांजली पाटील, शिवसेना शहरप्रमुख अशोक मराठे, मिलिंद मिसर, चंद्रकांत पाटील, पारोळा व्यापारी संघाचे अध्यक्ष केशव क्षत्रिय, अरूण वाणी, नगरसेवक नितीन सोनार तसेच पारोळा व्यापारी वर्ग, विविध विभागातील अधिकारी, शहरातील प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.







