चौकशी समिती नेमून कारवाई करण्याची गजानन मालपुरेची मागणी

जळगाव (प्रतिनिधी) – येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात मशिनरी खरेदीत अपहार झाल्याची शंका येथील सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेनेचे माजी महानगर प्रमुख गजानन मालपुरे यांनी व्यक्त केली आहे. त्याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देत चौकशी समिती नेमून दोषींवर कारवाई करण्याची मागणीदेखील केली आहे.
निवेदनात मालपुरे यांनी म्हटले आहे की, जिल्हा सामान्य रुग्णालयात मेमोग्राफी, फेको व इतर मशीन खरेदी करण्यात आल्या आहेत. त्यात अपहार झाला असावा अशी शंका येत आहे. या मशिनरी एकाच व्यावसायिकाकडून खरेदी झाल्या असून त्याच्या बिलात मेन्यूफेक्चरिंग कंपनीचे नाव, साईज नमूद नाही. मशिनरी खरेदीची बिले पाहिली आणि ऑनलाईन किंमत पाहता तफावत दिसून येत आहे. त्यामुळे याबाबत तज्ज्ञ लोकांची चौकशी समिती नेमून याविषयी तपासणी करावी.
तालुक्याच्या ठिकाणी मशिनरी खरेदी करून दोन ते तीन वर्षे झाली. मात्र या मशिनरी हाताळणारे तज्ञ नसताना पैशाचा अपव्यय झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सदर प्रकरणाची चौकशी करून जिल्हा शल्यचिकित्सक यांच्यासह संबंधित दोषी व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करीत प्रकरणाचे सविस्तर पुरावे देण्यास तयार असल्याचेही मालपुरे यांनी म्हटले आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.







