जिल्ह्यातील ४ गुणवंत विद्यार्थ्यांना ५१ हजार रूपयांची मदत

जळगाव (प्रतिनिधी) – येथील समाज कल्याण विभागातर्फे १५५ लाभार्थी चर्मकार समाजातील बांधवांना गटई स्टॉलचे वाटप नुकतेच करण्यात आले. या सोबत शालेय अभ्यासक्रमात गुणवंत असलेल्या चार विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५१ हजार रुपयांची मदत करण्यात आली.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ६ तालुका समन्वयक यांच्या मदतीने व समाज कल्याण निरीक्षक एम.ए.चौधरी, संत रोहिदास चर्मकार महामंडळाचे व्यवस्थापक एस.एन.तडवी यांच्या विशेष प्रयत्नाने जिल्हाभरात चर्मकार समाजातील पात्र १५५ लाभार्थ्यांना गटई स्टॉलचे वाटप करण्यात आले. चोपडा येथील अनुदानित मुलांच्या वस्तीगृहात तालूक्यातील एकूण ११ लाभार्थ्यांना विभागाचे तालुका समन्वयक जितेंद्र धनगर यांच्या हस्ते गटई स्टॉलचे वाटप करून समारोप करण्यात आला.
तसेच मागासवर्ग बहुजन कल्याण मंत्रालयातर्फे स्व.वसंतराव नाईक गुणवंत पुरस्कारांतर्गत जिल्ह्यातील १० वी व १२ वीत विशेष प्राविण्य प्राप्त अबोली दादाभाऊ मांडगे (पाचोरा), तेजस लिलाधर लोखंडे, यश सुनिल इंगळे (दोन्ही भुसावळ) व प्रांजल विलास सोनवणे (जळगाव) या विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५१ हजार रूपये धनादेश पुरस्कार स्वरूपात देवून त्यांचा गौरव करण्यात आला. सहा तालुका समन्वयक चेतन चौधरी , अनिल पगारे, महेंद्र पाटील, जितेंद्र धनगर, किशोर माळी, शिला अडकमोल यांच्या मदतीने वरील दोघही योजनांचा लाभ सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लाभार्थ्यांना देण्यात आला.
तालुक्याला सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभागाचे कार्यालय नसल्याने योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी या उद्देशाने तालुका समन्वयक यांची नियुक्ती असून ते प्रत्यक्ष गावपातळीवर जावून लाभार्थींना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. गाव व जिल्हा यांतील समाज कल्याण विभागाचे तालुका समन्वयक प्रमुख दुवा म्हणून काम पाहत आहेत.







