जळगाव (प्रतिनिधी) – राज्य शासनाच्या शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार आता सोमवारी २३ पासून ९ वी ते १२ वीच्या शाळा सुरू होणार आहेत. कोरोना प्रादूर्भाव होऊ नये या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचार्यांची कोविड चाचणी करून आवश्यक ते प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे. याबाबत जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे सीईओ आदींनी आदेश पारित केले आहेत.

कोरोना आरोग्य प्रमाणपत्र घेण्यासाठी शिक्षकांची मोठया प्रमाणावर गर्दी होत आहे. तीन तासांच्या कमी वेळेत शिक्षकांची तारांबळ उडत आहे.
जिल्हयात सोमवार दि.२३ नोव्हेंबर पासून माध्यमिक स्तरावरील ९ वी ते १२ वीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी शिक्षक- शिक्षकेतर कर्मचार्यांची कोवीड चाचणी करणे आवश्यक आहे. त्यानुसार जिल्हास्तरावर शासकिय तंत्रनिकेतन महाविद्यालयात तसेच तालुकास्तरावर ग्रामीण रूग्णालयासह ग्रमाीण भागत देखिल आरोग्य तपासणी केली जात आहे. जळगाव जिल्हास्तरावर शासकिय पॉलिटेक्नीक महाविद्यालयात सकाळी ९ते १२ वाजेदरम्यान शिक्षक कर्मचार्यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी मोठया प्रमाणावर बुधवार दि.१८ पासूनच रांगा लागल्या आहेत. जिल्ह्यात बुधवार दि.१८ नोव्हेंबर पासून या चाचण्या करून घेण्यात येत असून आतापर्यत सुमारे २५० ते ३०० शिक्षक कर्मचार्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली असल्याचे जिल्हा परिषदेकडून सांगण्यात आले.







