नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – भारतीय लष्कराने पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये पिनपॉईंट स्ट्राईक केल्याची माहिती समोर येत आहे. पीओकेतील दहशतवाद्यांचे लॉन्चिंग पॅड्स उद्ध्वस्त करण्यासाठी भारतीय लष्कराने ही कारवाई केली आहे. पाकिस्तानी सैन्याकडून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरू आहे. सीमेवरून दहशतवादी घुसवता यावेत यासाठी पाकिस्तानचे प्रयत्न सुरू आहेत. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी म्हणून भारतीय लष्कराने स्ट्राईक केल्याची माहिती ‘आऊटलूक’ ने सरकारमधील सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

हिवाळ्याच्या दिवसांमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून भारतीय हद्दीत दहशतवादी घुसवण्याचे प्रयत्न होतात. गेल्या आठवड्याभरापासून पाकिस्तानी सैन्य दहशतवाद्यांना भारतीय हद्दीत घुसखोरी करता यावी यासाठी सीमावर्ती भागात शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराने ‘पिनपॉईंट स्ट्राईक’ सुरू केले आहेत. जम्मू काश्मीरमध्ये अस्थिरता निर्माण करण्याचे प्रयत्न पाकिस्तानकडून सुरू असल्याची माहिती उच्चपदस्थ सुत्रांनी दिली आहे.






