जळगाव (प्रतिनिधी) – बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिच्याविरुद्ध खासगी फौजदारी खटला दाखल होता. त्या अनुषंगाने प्राथमिक चौकशी करुन कंगनाविरुद्ध गुन्हा दाखल करुन तपास करण्याचे आदेश न्यायालयाने मुंबई पोलिसांनादिले आहेत. या प्रकरणाच्या तपासात कंगना रनौत पोलिसांना सहकार्य करत नसेल तर ती कायदेशीर कारवाईला पात्र ठरेल, असे मत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले आहे.

उज्ज्वल निकम जळगावात आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते. यावेळी निकम यांनी अभिनेत्री कंगना रनौत हिच्याशी निगडित न्यायालयीन प्रकरणाच्या बाबतीत मत मांडले. निकम म्हणाले की, या प्रकरणात मुंबई पोलिसांनी कंगना रनौतला दोन वेळा समन्स बजावले, तरी ती गैरहजर राहिली. त्यानंतर पोलिसांनी आता कंगनाला तिसऱ्यांदा समन्स पाठवले आहे. कंगनाने या समन्सचे उल्लंघन केले तर पोलीस न्यायालयात जाऊन तिच्याविरुद्ध नॉन बेलेबल (अजामिनपात्र) किंवा बेलेबल (जामिनपात्र) वॉरंट मागू शकतात. जेणेकरून पोलिसांना चौकशीसाठी पुढे मदत होऊ शकते.
पोलीस यासाठी तिला त्वरित अटकही करु शकतात. मुंबई पोलीस अॅक्ट आणि सीआरपीसीतील तरतुदीनुसार कंगनाविरुद्ध मुंबई पोलीस कारवाई करु शकतात, असे उज्ज्वल निकम यांनी सांगितले.
कंगनासह तिची बहीण रंगोली रनौत-चंदेल हिलाही मुंबई पोलिसांनी समन्स बजावला आहे. त्यामुळे या दोघींनाही वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे. येत्या 23 नोव्हेंबरला कंगनाला, तर 24 नोव्हेंबरला रंगोलीला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पहिला समन्स – 26 आणि 27 ऑक्टोबर, दुसरा समन्स – 9 आणि 10 नोव्हेंबर, तिसरा समन्स – 23 आणि 24 नोव्हेंबर, कंगना विरोधात याचिका दाखल
कंगनासह तिची बहीण रंगोली रनौतविरोधात वांद्रे पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. कंगनाने मुंबईबद्दल वादग्रस्त ट्वीट करताना हिंदू आणि मुस्लिम यांच्यात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केले होते. या वक्तव्याविरोधात कंगना विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती.
दिग्दर्शक साहिल सय्यदने प्रथम मुंबई पोलिसात अर्ज दाखल केला होता. मात्र पोलिसांनी अर्जाची दखल न घेतल्याने त्याने कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर कोर्टाने कंगना आणि रंगोलीविरोधात 1523 A, 295 A, IPC 124 A या कलमातंर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
कंगना रनौत हिने मध्यंतरी बॉलिवूड इंडस्ट्रीवर टीका करताना या ठिकाणी मुस्लिमांचे प्राबल्य असल्याचे वक्तव्य केले होते. मी झाशीच्या राणीच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवून हे इस्लामी प्राबल्य मोडून काढले, अशी मुक्ताफळे कंगना रनौत हिने उधळली होती. या पार्श्वभूमीवर मुन्ना वराली आणि साहिल अशरफ सय्यद यांनी वांद्रे कोर्टात कंगनाविरुद्ध याचिका दाखल केली होती. पोलीस कंगना रनौत हिच्यावरोधात तक्रार दाखल करुन घेत नसल्याचे त्यांनी याचिकेत म्हटले होते.
अभिनेत्री कंगना रनौत वारंवार बॉलिवूडची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे. सोशल मीडियापासून प्रसारमाध्यमांपर्यंत प्रत्येक ठिकाणी ती बॉलिवूडच्या विरोधात बोलते. ती प्रत्येक वेळी बॉलिवूडला घराणेशाही आणि कंपूबाजीबद्दल बोलत असते, असेही याचिकेत सांगण्यात आले होते. यानंतर वांद्रे न्यायालयाने कंगना रनौतविरोधात धार्मिक तेढ पसरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.







