जळगाव (प्रतिनिधी) – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अंतिम वर्ष/ अंतिम सत्राच्या बॅकलॉगसह नुकत्याच घेण्यात आलेल्या परीक्षेत जे विद्यार्थी काही कारणामुळे परीक्षा देऊ शकले नव्हते अशा वंचित विद्यार्थ्यांसाठी आज दि.१८ नोव्हेंबर पासून ऑनलाईन परीक्षा सुरू झाल्या. पहिल्या दिवशी दुपारपर्यंत ६५० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.

दि.१८ ते २० नोव्हेंबर या कालावधीत एमसीक्यु पॅटर्ननुसार फक्त ऑनलाईन पध्दतीने या परीक्षा घेण्यात येत आहेत. १२ ऑक्टोबर पासून अंतिम वर्ष/अंतिम सत्राच्या परीक्षा घेण्यात आल्या. जे विद्यार्थी परीक्षा अर्ज सादर करूनही परीक्षा देऊ शकले नाहीत त्यांच्यासाठी ऑनलाईन पध्दतीने सकाळी ० ते सायंकाळी ६ या वेळेत या परीक्षा घेण्यात येत आहेत. दि.१२ ते २० ऑक्टोबर या कालावधीतील वेळापत्रकातील सर्व विषयांसाठी त्यांच्याशी संबंधित असलेल्या विषयांची परीक्षा दि. १८ ते २० नोव्हेंबर या कालावधीमध्ये आणि दि.२४ ऑक्टोंबर ते १२ नोव्हेंबर या कालावधीतील वेळापत्रकातील सर्व विषयांसाठी परीक्षा दि.२१ ते २३ नोव्हेंबर या कालावधीत परीक्षा घेतल्या जात आहेत. बुधवारी ६५० विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा दिल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी.पाटील यांनी दिली.







