जिल्ह्यात शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेचा अभाव

विश्वजीत चौधरी
जळगाव – राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्षाची एकत्रित सत्ता आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचे आहे. जिल्ह्यात सेनेचे ४ आमदार आहे. जळगावच्या सेना नेत्यांचे मुंबईच्या दरबारात वजन आहे. मात्र तरीही शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते जळगाव जिल्ह्यात आक्रमक होताना का दिसत नाही हा प्रश्न अनेक शिवसैनिकांसह शिवसेनाप्रेमी नागरिकांना पडला आहे. आदरणीय संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या १७ नोव्हेंबरच्या स्मृतिदिनानिमित्त जिल्ह्यातील सेनेच्या कामगिरीचा हा थोडक्यात लेखाजोखा सेनेच्या कारभाराविषयी प्रभावी भाष्य करीत आहे.
शिवसेना पक्षात आज उपनेते, प्रवक्ते आणि राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे मुख्यमंत्र्यांच्या दरबारात विशेष वजन आहे. त्यांचा आक्रमक व सडेतोडपणा सेनेच्या आजच्या सत्तेच्या काळात देखील दिसून येतो आहे. सेनेचे प्रवक्ते म्हणून त्यांचा आक्रमकपणा सेनेचे अस्तित्व दाखवितो. मात्र जिल्ह्यातील पक्ष बांधणी, संघटन, वक्तेशूपणा, प्रशिक्षण, मार्गदर्शन याबाबत शिवसेना कोलमडलेली दिसून येत आहे. मागील महिन्यात जिल्हा प्रभारी संजय सावंत ३ दिवस जिल्ह्यात आले होते. त्यांनी सर्व पातळ्यांवर सेनेची चाचपणी केली होती.
यावेळी सेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा आणण्यासाठी सावंत यांनी काही टिप्स देण्याचा प्रयत्न केला. जिल्हाप्रमुख, महानगर प्रमुख, विविध आघाड्यांचे पदाधिकारी, नगरसेवक, जि.प.सदस्य यांनी त्यावेळी बैठकीला उपस्थिती दिली होती. प्रसंगी नेते गुलाबराव पाटील यांनी तर, “रडूबाई रडू, कोपऱ्यात बसू” हे उद्योग सोडा आता. आपल्या पक्षाची सत्ता असताना आपण पक्ष पातळीवर शांत का दिसतो ? असे परखड मार्गदर्शन केले होते. गिरीश महाजन हे विरोधी बाकावरील आमदार सत्ताधाऱ्यांना हैराण करून सोडत असताना त्यांना फक्त गुलाबराव पाटील हेच उत्तर देण्याचा प्रयत्न करतात. भाजपचे जिल्हाध्यक्ष राज्यातील सत्तेवर आरोप लावत असतांना सेनेकडून काहीच प्रतिक्रिया नाही. महिलांवरील अत्याचार वाढले म्हणून भाजप महिला आघाडी भेटी, पत्रकार परिषद घेतात. पण सेनेची महिला आघाडीची कुठेही भूमिका सध्या दिसत नाही. बाळासाहेब ठाकरे त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे प्रसिध्द होते. त्यामुळे जिल्ह्यात सेनेचा आक्रमक पवित्रा कोठे गायब झाला ? असा प्रश्न सेनेच्या सामान्य कार्यकर्त्यांना पडला आहे.







