जळगाव (प्रतिनिधी) – येथील प्रसिद्ध साप्ताहिक “केसरीराज” या दिवाळी अंकाचे प्रकाशन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. कोरोना संक्रमणाच्या या काळात अतिशय साध्या पद्धतीने मास्क घालून सर्व नियम पाळून हे प्रकाशन झाले.

यावेळी संस्थापक संपादक भगवान सोनार, कार्यकारी संपादक नरेश बागडे, वरिष्ठ उपसंपादक विश्वजीत चौधरी, कार्यालय व्यवस्थापक कुणाल बारी उपस्थित होते. प्रथम “केसरीराज” साप्ताहिकविषयी भगवान सोनार यांनी माहिती दिली.
यावेळी जिल्हाधिकारी राऊत म्हणाले की , दिवाळी अंक हा वाचन चळवळीचा एक भाग आहे. माणूस “वाचेल” तर वाचेल. दिवाळी अंकांमधून आपल्याला वैचारिक समृद्धी मिळत असते. “केसरीराज”ने दिवाळी अंकाच्या ‘संपादकीय’ मधून प्रदूषणमुक्त दिपावलीचा दिलेला संदेशदेखील खूप मोलाचा आहे. ऑनलाईन पोर्टलमध्ये काम करताना माहीती देताना संयमीपणा व परिपूर्णता असायला हवी. सामाजिक प्रबोधनाच्या दृष्टीने देखील ‘केसरीराज’मधून सातत्याने आणखी लिखाण होण्याची अपेक्षा देखील राऊत यांनी व्यक्त केली.
कोरोना संक्रमण थोपविण्यासाठी जिल्हाधिकारी राऊत यांनी केलेल्या अतुलनीय कामगिरीची प्रशंसा करीत यावेळी संस्थापक संपादक भगवान सोनार यांनी त्यांचे जिल्हावासीयांतर्फे आभार मानले.







