जळगाव (प्रतिनिधी) – येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील चलन गैरव्यवहारातील मुख्य संशयित नागेश गंगाधर पाटील याच्या अडचणीत आणखी वाढ झाली असून त्याच्या जामीनावरील कामकाज लांबले आहे.

जळगाव न्यायालयात रविवारी १५ नोव्हेंबर रोजी होणारे कामकाज आता १८ तारखेला होणार आहे. नंदूरबारचे प्रकरण पुढे आल्यानंतर आता आणखी भिवंडीतील नारपोली पोलीस ठाण्यातही नागेश पाटीलवर असाच गुन्हा दाखल असल्याचे नवीन प्रकरण पुढे आले आहे.
नागेश पाटील याची पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर शनिवारी त्याला हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी करुन जामीनावर रविवारी कामकाज ठेवले होते. रविवारी न्या.सुवर्णा कुळकर्णी यांच्या न्यायालयात जामीन अर्ज ठेवण्यात आला असता न्यायालयाने आधीच्या न्यायालयाकडून गुन्ह्याचे कागदपत्रे मागवून जामीनावर १८ रोजी कामकाज ठेवले. सरकारी वकील बी.यु.पाटील यांनी नागेश पाटील याच्यावर नंदूरबार येथे गुन्हा दाखल झाल्याचा युक्तीवाद शनिवारी केला होता. भिवंडीतही गुन्हा दाखल असल्याचे कागदपत्रे प्राप्त झाली आहेत, मात्र न्यायालयात कामकाज न झाल्याने ते सादर केलेले नाहीत. वाहन क्र.एम.एच.२३ डब्लु ९४१८ व एम.एच.२३ डब्लु ९९६५ ही वाहने बनावट कागदपत्राद्वारे बीड येथील आरटीओ कार्यालयातून हस्तांतरीत झाल्याचे अभीलेखात नमूद आहे. त्याशिवाय या वाहनासंबंधीत नोंद नागेश पाटील यांनी केल्याचे स्पष्ट झाले होते, त्यामुळे नारपोली पोलिसांनी नंदूरबार आरटीओ कार्यालयातून मुळ कागदपत्रे मागिवली होती. ही सर्व कागदपत्रे रामानंद नगर पोलीस व सरकारी वकीलांकडे प्राप्त झाली आहेत.







