जळगाव ;– कोरोना विषाणूला अटकाव करण्यासाठी राज्य सरकारने अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व बाबींवर बंदी घातली आहे. अशा परिस्थितीत जळगाव शहरातील कंजरवाडा परिसरात अवैध दारू विक्री सुरू होती. याठिकाणी एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकून हजारो रुपयांचा दारूचा साठा जप्त केला आहे. मंगळवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली असून याप्रकरणी दोन ते तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
जळगाव शहरातील कंजरवाडा परिसरात अवैध दारू विक्री सुरू असल्याच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास एमआयडीसी पोलिसांच्या एका पथकाने कंजरवाडा परिसरात डमी ग्राहक पाठवून अवैध दारू विक्री होत असल्याची खात्री केली. डमी ग्राहकामुळे पोलिसांना कुठे दारू विक्री होत आहे? याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी जास्तीची कुमक मागवून घेत छापा टाकला. या कारवाईत हजारो रुपयांचा अवैध दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे. अवैध दारू विक्री करणाऱ्या दोन ते तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
या कारवाई प्रसंगी काही महिलांनी पोलिसांशी हुज्जत घातली. मात्र, पोलिसांनी बळाचा वापर करत अवैध दारू विक्री करणाऱ्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.