वसुलीच्या रक्कमेतील तफावत कमी करण्याची दुकानदारांची मागणी
जळगाव (प्रतिनिधी) – येथील महानगरपालिकेच्या पिंप्राळा परिसरात असलेल्या सोमाणी मार्केट मधील दुकानदारांना थकबाकी भरण्याची नोटीस आले आहेत. मात्र या सर्व बाबींच्या रकमा या जास्त प्रमाणात असल्यामुळे दुकानदारांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. या वसुलीच्या रक्कमेतील तफावत कमी करावी व नियमानुसार थकित रक्कम सांगावी अशी मागणी दुकानदारानी केली आहे. याप्रकरणी दुकानदारांनी बुधवारी ११ नोव्हेंबर रोजी आयुक्तांची भेट घेऊन त्यांची कैफियत मांडली.
येथील व्यापाऱ्यांनी “केसरीराज” ला सांगितले की, मार्च २०१८ पर्यंत आमचे भाडे आणि इतर कर १३२७ रुपये हे तर घरपट्टी ३७२ याप्रमाणे १६९९ रुपये इतका होतो. सदर नोटीसमधील नुकसानभरपाई ही ६२ हजार २५० रुपये ही बारा महिन्यानंतर दाखवली आहे. ही तफावत खूप जास्त आहे. त्यामुळे भरपाईची रक्कम नियमानुसार लावून कमी करून द्यावी, यासाठी त्यांनी आयुक्तांना पत्र दिले आहे. सोमाणी मार्केटमधील इतर दुकानदारांना देखील अशा स्वरूपाच्या नोटिसा आल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे महापालिकेच्या अजब कारभाराबाबत आश्चर्य व्यक्त केले जात असून महापालिका थकबाकीची नोटीस पाठवताना व्यवस्थित पाठवत नाही का असा प्रश्न निर्माण होत आहे.
ऐन दिवाळीत आम्ही करायचे काय ? एकतर कोरोनामुळे गेल्या 4 महिने दुकाने बंद आणि आता मनपाकडून अवाच्या सव्वा बिल दिले जात आहे, असा संताप सोमाणी मार्केटच्या व्यापारी यांनी व्यक्त केला आहे.
सोमाणी मार्केटमधील व्यापाऱ्यांना महापालिकाने थकबाकीची नोटीस पाठवली होती.त्यानंतर व्यापाऱ्यांनी आज दि.११ रोजी दुपारी आयुक्तांना आपले म्हणणे सादर केले.त्यात म्हटले आहे की,सद्या कोरोनामुळे आमच्या व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाले असून त्यात आम्ही लहान व्यवसायीक कसे तरी आमचा कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे.त्यात अव्वाचा सव्वा बिल मनपाने दिल्याने आमचे तर कंबरडेच मोडले आहे.त्यामुळे आम्हाला बिल कमी करून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी पिप्राळा येथील सोमाणी मार्केटच्या व्यापाऱ्यांनी केली आहे.