पाटणा (वृत्तसंस्था) – बिहार विधानसभा निवडणूक निकालाबाबत आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार एनडीएला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. महत्वाची बाब म्हणजे बिहारमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरु शकतो, असा कल सध्या पाहायला मिळत आहे. बिहारमध्ये भाजपला मिळत असलेल्या या यशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मोठा वाटा म्हणावा लागेल.

बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपचे स्टार प्रचारक असलेले योगी आदित्यनाथ यांनी ज्या-ज्या मतदारसंघात प्रचारसभा घेतल्या त्या जागांवर भाजपला मोठा फायदा होताना दिसत आहे. योगी आदित्यनाथ यांनी बिहारमध्ये आठवड्याभरात एकूण 18 रॅली काढल्या. म्हणजे योगी यांनी दिवसाला 3 प्रचार रॅली केल्या. महत्वाची बाब म्हणजे 2015च्या बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपला ज्या जागांवर मोठा फटका बसला होता. अशा जागांवर योगी आदित्यनाथ यांनी एनडीएचा प्रचार केला.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात योगी आदित्यनाथ यांनी 6 जागांवर प्रचार केला. त्यात जमुई, काराकाट, पालीजंग, तरारी, अरवल या जागांचा समावेश होता. या सर्व जागांवर 2015मध्ये भाजपला पराभव स्वीकारावा लागला होता. यासह पूर्णिया, सहरसा, सिवान, गोरेयाकोठी, भागलपूर, गोविंदगंज, झंझारपूर आणि दरभंगा या जागांवरही योगींनी प्रचार केला. या ठिकाणी योगींचा प्रचार कामी येताना दिसत आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर भाजप सर्वात मोठा पक्ष ठरु शकतो. त्या पार्श्वभूमीवर मोदी है तो मुमकीन है, अशी प्रतिक्रिया उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली आहे. बिहारमध्ये भाजपच्या वाढलेल्या जागा हे भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं यश असल्याचं योगीं म्हणाले. कोरोना संकटातही ‘संघटन ही सेवा है’ अशा भावनेतून कार्यकर्त्यांनी काम केलं. त्याचाच परिणाम म्हणून बिहारमध्ये जागा वाढल्याचं योगी आदित्यनाथ पत्रकार परिषदेत म्हणाले.
‘बिहार निवडणुकीत ज्या पद्धतीने भाजपनं संघटन उभारलं आणि पाच वर्षांत जे काम झालं. त्याचा परिणाम निकालावर झालेला दिसतो आहे. एनडीएला जनतेने भरभरून मते दिली आहेत. त्यामुळेच बिहारमध्ये एनडीएची सत्ता पुन्हा येणार असल्याचं दिसत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीने बिहारमध्ये प्रचाराची धुरा सांभाळली त्याचेच यश बिहार निवडणुकीत दिसून येत आहे’, असा दावा भाजपचे विदर्भातील नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.







