जळगाव (प्रतिनिधी) – भुषण भरत सोनवणे याचा इंद्रप्रस्थ नगरातील खडके चाळ येथे चॉपरने निर्घृण खून केल्याची घटना रविवारी रात्री घडली. याप्रकरणी तीन जणांना मध्यरात्री अटक करण्यात आली असून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आज न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सविस्तर वृत्त असे की, शिवाजी नगर परिसरातील स्मशान भूमिजवळ जळगावचे माजी महापौर अशोक सपकाळे यांचा मुलगा राकेश सपकाळे याची पाच दिवसापूर्वी पूर्व वैमनस्यातून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या गुन्ह्यात चार जणांना अटक करण्यात आली आहे. हि घटना ताजी असता, काल दि. ८ रोजी रात्री ११. १५ च्या भूषण भरत सोनवणे (वय 25) रा. इंद्रप्रस्थ नगर परिसरातील सिध्दीविनायक पार्क जुना कानळदा रोड, जळगाव हा इंद्रप्रस्थ चौकात अतुल ज्ञानेश्वर काटकर (वय २५, रा. शाहूनगर), प्रतीक निंबाळकर (वय २४ रा. शिवाजी नगर) व दुर्गेश आत्माराम संन्यास (वय २६ रा. गेंदालाल मिल) हे दारू पिलेले होते. यावेळी किरकोळ वाद होऊन भूषण सोनवणे याने शिवीगाळ करीत प्रतिकच्या कानशिलात मारली. त्याचा राग आल्याने प्रतीक निंबाळकर याने त्याच्याकडील चॉपर काढून भूषणच्या पोटात खुपसला. तसेच मानेवर, मांडीवर वार केले. त्यानंतर अतुल काटकर यानेही त्याच चॉपरने भूषणवर पुन्हा वार करीत त्याला जीवे ठार मारले. पोटात खोलवर वार झाल्याने भूषण सोनवणे हा जागीच गतप्राण झाला. यानंतर संशयित घटनास्थळावरून फरार झाले होते.
रात्रीच शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तेजस मराठे, योगेश इंधाटे यांनी गुप्त माहिती काढून अतुल काटकर, दुर्गेश आत्माराम संन्यास यास घरातून तर फरार होत असताना प्रतीक निंबाळकर याला बहिणाबाई उद्यानाजवळून ताब्यात घेतले. आज तिघांना जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय येरूळे हे करीत आहे.