भूजल स्पर्धेत तालुक्यातील चैतन्य तांडा, ब्राम्हणशेवगे, चिंचगव्हाण यांना मिळाली लाखोंची बक्षिसे…
चाळीसगाव (प्रतिनिधी) : जलसाक्षरता ही काळाची गरज असून गावागावात पाण्याचे ज्ञान असणारे लोक देखील असले पाहिजेत. चाळीसगाव तालुक्यात भूजल अभियानाच्या माध्यमातून जलसाक्षर असणारा प्रशिक्षित वर्ग गावागावात निर्माण झाला तर पुढील काळात चाळीसगाव तालुका जलसंपन्न होईल, असे प्रतिपादन भूजल तज्ज्ञ, सहज जलबोधकार उपेंद्र धोंडे यांनी केले.
आमदार मंगेश चव्हाण यांच्या शिवनेरी फौंडेशन संचालित भूजल अभियान अंतर्गत सहज जलबोध अभियानाच्या माध्यमातून, पहिले खान्देशस्तरीय जल-संमेलनाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जीएसडीएचे उपसंचालक दिवाकर धोटे, भूजल तज्ज्ञ अनुपमा पाटील, जिल्हा कृषी उपसंचालक अनिल भोकरे, तालुक्याचे प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार अमोल मोरे आणि गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांच्यासह चाळीसगाव तालुक्यातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
संमेलनाचे उद्घाटन मागील वर्षी भूजल स्पर्धेत चाळीसगाव तालुक्यात सहभागी झालेल्या ११ गावात निर्माण झालेल्या पाणीसाठ्यामधून आणलेल्या पाण्याचे मंचावर निर्माण केलेल्या कृत्रिम तलावात जल पूजन करून करण्यात आले. तसेच मागील वर्षी चाळीसगाव तालुक्यात भूजल अभियानाच्या वतीने करण्यात आलेल्या कामांची माहिती देणारी चित्रफित व गाण्याचे प्रक्षेपण देखील करण्यात आले.
गुणवंत सोनवणे संगणक अभियंता पुणे यांनी मागील वर्षी भूजल अभियानाच्या माध्यमातून चाळीसगाव तालुक्यात झालेल्या कामाचा प्रवास आणि पुढील वर्षी होणाऱ्या कामांची माहिती सांगितली. मागील वर्षी सुरू झालेल्या शिवनेरी फौंडेशन संचलित भूजल अभियानाअंतर्गत ज्या गावांनी जल संधारण आणि मृदा संधारणचे स्पर्धेदरम्यान उकृष्ट दर्जाची कामे केली त्या गावांत प्रथम पारितोषिक चैतन्य तांडा क्र.०४ ला १ लाख ५१ हजार रु., द्वितीय पारितोषिक ब्राम्हण शेवगे-नाईकनगर येथे १ लाख १ हजार रुपये आणि तृतीय पारितोषिक सुंदरनगर-चिंचगव्हाणला ७५ हजार रु. या गावांनी पटकावले.
आमदार मंगेश चव्हाण यांनी, विठ्ठलाची वारी ही कुणाच्या मालकीची नसते. तसेच शुद्ध अंतकरणाने ही जलवारी सुरु केली असून तालुक्यात सुरू झालेल्या या जलचळवळीसाठी सगळ्याच राजकीय, सामाजिक आणि शासकीय क्षेत्रांतील लोकांनी पुढें यावं यासाठी आवाहन केले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात, शासकीय पातळीवर ग्रामविकासासाठी महत्वाच्या असणाऱ्या या अभियानाला सर्वोतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली. कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांनी उपलब्ध असणाऱ्या पाण्याचे नियोजन व पिकपद्धती यावर मार्गदर्शन केले.
तांत्रिक प्रशिक्षक जितेंद्र पाटील यांनी आदर्श भूजल आराखडा या विषयावरती मार्गदर्शन केले. तसेच भागवत बैरागी कुंझर यांनी तलाव पुनर्भरण आणि योगेश सोनवणे, कळमडू यांनी निसर्गबेट यावरती मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन विजय कोळी यांनी केले. आभार शिवनेरी फौंडेशनच्या अध्यक्षा प्रतिभा चव्हाण यांनी मानले. संमेलन यशस्वीतेसाठी भूजल अभियान कोअर टीम आणि आमदार कार्यालयातील संपूर्ण स्टाफ यांनी परिश्रम घेतले.