जळगाव (प्रतिनिधी) – महाबळ कॉलनी रोड ते संभाजीनगरच्या दरम्यान त्र्यंबक नगर प्राथमिक विद्यामंदिर जवळ कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत महिला गंभीर जखमी झाली आहे. तर कारचालकला जमावाने चोप देत पोलीस स्टेशनला जमा केले आहे.

समता नगर येथील रहिवासी भिमराव नारायण साळुंखे (56) हे त्यांच्या पत्नी आशाबाई भीमराव साळुंखे (वय 53) यांच्यासोबत गावात काही कामानिमित्त जात असताना त्र्यंबक नगर प्राथमिक विद्या मंदिराजवळ उतरतीवरून संभाजीनगरकडे येत असलेल्या कार क्रमांक जेएच 05 एएन 2083 ने त्यांना जबर धडक दिली. या धडकेत दाम्पत्य खाली पडले. आशाबाई यांच्या डाव्या हाताला, चेहर्याला व शरीराला जबर मुक्कामार लागला असून त्यांना खाजगी दवाखान्यात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. तर त्यांचे पती भीमराव यांनादेखील मार लागला असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
घटनेनंतर नागरिकांनी कार चालकाला बाहेर काढत बेदम चोप दिला. यावेळी कारचालक हा दारूच्या नशेत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. यानंतर कारचालक बिनाकी शिथिल मुखर्जी (वय 40)रा. रायसोनी नगर याला रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले. पोलिस पुढील कार्यवाही करीत असून उशिरापर्यंत घटनेची नोंद करण्यात आलेली नव्हती.







