जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील गणेश कॉलनी भगत रहिवासी असलेल्या चेतन डिगंबर वाणी या कापड व्यावसायिकाला मास्क आणि कोवीड कीट तयार करण्याच्या नावाखाली 55 हजार 500 रूपयांत ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना शनिवारी समोर आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

गणेश कॉलनीत चेतन डिगंबर वाणी हे परिवारासह वास्तव्यास आहेत. ते कपड्याचा व्यवसाय करत होते. पण सध्या घरीच आहे. 24 जुलै दुपारी वाणी यांना फोन आला. हर्षील पटेल प्रितमपूर येथून बोलत असून आमची ए यू 24 एच 7 नावाची मास्क व सॅनिटायझर, कोवीड कीट तयार करण्याची कंपनी असल्याचे वाणी यांना सांगितले. ऑनलाईन ऑर्डर घेवून सामान घरपोच पोहचवित असल्याचेही त्याने सांगितले. यानंतर संबंधिताने वाणी यांना जळगावची एजन्सी घ्या, असे सांगून आम्ही सर्व मटेरीयल घरपोच पाठवू असे सांगितले. एजन्सी घेण्याचा फॉर्म सुध्दा संबंधिताने पाठवला. यानंतर वाणी यांनी दिलेल्या मेल आयडीवर सर्व डिटेल्सही संबधिताने पाठविले.
25 जुलै रोजी वाणी यांनी संबंधितांना फोनवरुन एजन्सी घेण्यास इच्छुक असल्याचे सांगितले. यानंतर दुसर्या दिवशीच फोन आला. फोनवरुन खुशबू मॅडम बोलत असल्याचे सांगण्यात आले. तसेच एजन्सी घ्यावयाची असले तर रजिस्ट्रेशन करावे लागेल, यानंतर वाणी यांनी कागदपत्रांची पूर्तता केल्यावर 55 हजार 500 रुपये डिपाॅझिट करावे लागलीत, असे सांगण्यात आले. त्यानुसार 27 जुलै रोजी वाणी यांनी मध्यप्रदेश येथील बॅक ऑफ बडोदाच्या निपानीया शाखेत ए.यू.निखिल कुमावत नावाने असलेल्या खात्यावर 55 हजार 500 रुपये जमा केले. पेैसे जमा केल्यावरही माल न आल्याने वाणी यांनी संबधितांना संपर्क साधला. मात्र उडवाउडवीचे उत्तर देण्यात येवून टाळाटाळ करण्यात आली. यानंतर वाणी यांनी संपर्क साधल्यावर संबधितांनी फोन उललणे बंद केले. आजपावेतो माल न मिळाल्याने फसवणूकीची खात्री झाल्यावर 7 नोव्हेंबर रोजी चेतन वाणी यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







