जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहर महानगर पालिके अंतर्गत नोंदणीकृत गरीब महिला बचत गटांना सागर पार्क येथे स्टॉलसाठी मोफत जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या स्टॉलचे रविवार दि. ८ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता उदघाटन होणार आहे.
दिवाळी सणानिमित्त महिला बचत गटांनी तयार केलेल्या साहित्यांची विक्री करून त्यांना आर्थिक स्थैर्य देण्याचा महापालिकेचा उद्देश आहे. रविवारी महापौर भारती सोनवणे, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील, आयुक्त सतीश कुलकर्णी, महिला व बाल कल्याण सभापती रंजना सपकाळे यांच्या उपस्थितीत स्टॉलचे उदघाटन होणार आहे. स्टॉलला भेट देऊन नागरिकांनी साहित्याची खरीदी करून गरीब महिला बचत गटांना आर्थिक हातभार लाभावा असे आवाहन महिला व बालकल्याण समितीच्या सभापती रंजना सपकाळे यांनी केले आहे.








