जळगाव येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निकाल
जळगाव (प्रतिनिधी) – दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून जळगाव शहरातील राजीव नगर परिसरात सन जुलै २०१७ मध्ये एका तरुणाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला होता. याप्रकरणी आज न्यायालयाने एकाच परिवारातील पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. दरम्यान, आरोपींमध्ये दोन महिलांचा समावेश आहे.
याबाबत सविस्तर अजय प्रल्हाद सकट (वय २२), रा. राजीव गांधी नगर याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले होते की, दि. १२ जुलै २०१७ रोजी त्याचा भाऊ राहुल सकट याचा पगार झालेला होता. त्यामुळे घरासमोर असलेल्या टेकडीजवळील परिसरात जेवणासाठी गेलेला होता. त्यावेळी सत्यासिंग मायासिंग बावरी याने राहुलकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. परंतु राहुलने पैसे दिले नाहीत, म्हणून दोघांमध्ये शिवीगाळ झाली. त्यानंतर रात्री १० वाजेच्या सुमारास सत्यासिंग बावरी व त्याचे भाऊ रवीसिंग बावरी, मलिंगसिंग बावरी, आई मालाबाई बावरी, पत्नी कालीबाई बावरी असे घरासमोर आले व त्यांनी शिवीगाळ करून राहुलला लाता-बुक्क्यांनी मारहाण करायला सुरुवात केली.
यावेळी माझी आई माळसाबाईने विरोध केला असता सत्यासिंग व रवीसिंगने तिला भिंतीवर ढकलून दिले. त्यामुळे आईंच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यानंतर सत्यासिंगने धारदार शस्त्राने राहुलच्या पोटाच्या डाव्या बाजूला चाकू खुपसून गंभीर दुखापत केली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस स्थानकात भादवि कलम १४३,१४७,१४८,१४९,३२३,३०७,५०४ मुंबई पोलीस ऍक्ट ३७ (१) (३) चे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.