जळगाव (प्रतिनिधी) – राज्यपालांकडून विधान परिषदेत नियुक्त करण्यात येणाऱ्या सदस्यांसाठी १२ जणांच्या नावांची यादी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे महाविकास आघाडीतर्फे सोपवण्यात आली. या यादीत खानदेशातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे अपेक्षेप्रमाणे एकनाथराव खडसे यांना तर, शिवसेनेतर्फे नंदुरबारच्या माजी आ. चंद्रकांत रघुवंशी यांना संधी दिली आहे.
राज्यपाल नियुक्त होत असलेल्या १२ सदस्यांच्या नावावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंतिम निर्णय झाल्यानंतर आज शुक्रवारी ६ नोव्हेंबर रोजी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेऊन यादी सुपूर्द केली. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेकडून प्रत्येकी चार जणांची शिफारस करण्यात आली आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्यानंतर आज महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. सायंकाळी ६ वाजता अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, परिवहन मंत्री अनिल परब आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली. तिन्ही मंत्र्यांनी राज्यपाल कोट्यातून विधानपरिषदेवर पाठवायच्या उमेदवारांची यादी राज्यपालांकडे सोपवली.
यादीत काँग्रेसकडून सचिन सावंत,रजनी पाटील,मुजफ्फर हुसैन, अनिरुद्ध वणगे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी मंत्री एकनाथराव खडसे, माजी खा. राजू शेट्टी, यशपाल भिंगे, आनंद शिंदे, शिवसेनेकडून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, व्याख्याते नितीन बानगुडे पाटील, विजय करंजकर, माजी आ. चंद्रकांत रघुवंशी यांचा समावेश आहे. यावेळी सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून नावे राज्यपालांकडे सोपविली आहे. असे अनिल परब यांनी माध्यमांना सांगितले.