शिवसेनेचे स्थायी समिती सदस्य प्रशांत नाईक यांचा सवाल
जळगाव (प्रतिनिधी) – देशातील भाजपप्रणीत मोदी सरकारने स्मार्ट सिटी म्हणून देशातील ३०० शहरांमध्ये जळगावचा समावेश केला. मात्र, भाजपचीच सत्ता असलेल्या जळगाव महानगरपालिकेत घनकचरा व्यवस्थापन योजनेमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार होऊन देखील भाजपचे पदाधिकारी गप्प बसण्याचे कारण काय? असा सवाल शिवसेनेचे नगर सेवक तथा स्थायी समिती सदस्य प्रशांत नाईक यांनी विचारला आहे.
घनकचरा व्यवस्थापना अंतर्गत २०१५ साली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शहरांचा विकास करण्यासाठी स्मार्ट सिटी हि योजना आणली होती. यात ३०० शहरांची निवड झाली. यात जळगावचा देखील समावेश आहे. यासाठी महापालिकेकडून पत्राद्वारे प्रस्ताव देखील मागविण्यात आला होता. यात ५० टक्के अनुदान केंद्रातर्फे, ३० टक्के राज्य सरकार व २० टक्के मनपाच्या १४ व्या वित्त आयोगातून खर्च करण्याविषयी राज्य सरकारने जी.आर. उपलब्ध करून दिला आहे.
सध्या जळगाव महानगर पालिकेत भाजपाची सत्ता आहे. जिल्ह्यात दोन्ही खासदार, शहराचे आमदार, तसेच मनपाचे पालकत्व घेतलेले गिरीश महाजन हेही भाजपचेच आहे. असे असूनही मनपात लाखो रुपयांचा अधिकारी भ्रष्टाचार करीत असतांना भाजपचे ६१ नगरसेवक गप्प का बसले आहेत ? असा सवाल प्रशांत नाईक यांनी केला आहे. भाजपाची प्रशासनावर कुठलीही पकड राहिलेली नाही त्यामुळे कारभार चालवता येत नसेल तर भाजपने सत्ता सोडावी असाही टोला प्रशांत नाईक यांनी लगावला आहे.