जळगाव (प्रतिनिधी) – फैजपूर ते भुसावळ रस्त्यावर काकाच्या उत्तरकार्याच्या कार्यक्रमाला जात असतांना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात मागे बसलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी दि. ५ नोव्हेंबर रोजी सकाळी पाडळसा ता.यावल येथील पाटचारी जवळ घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, विवरे ता. रावेर येथील रहिवासी गणेश भागवत राणे (वय ४६) हे गुरूवारी दुचाकीव्दारे जळगाव येथे त्यांच्या काकाचे उत्तरकार्य असल्याने पत्नी तृप्ती राणे (वय ३६) यांना सोबत घेवून जात होते. सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास फैजपूर – भुसावळ रस्त्यावर पाडळसा, ता. यावल येथील पाटचारीजवळ त्यांची दुचाकी घसरली व त्यात त्यांची पत्नी तृप्ती राणे यांना डोक्याला जबर दुखापत झाली, तर गणेश राणे यांना देखील हाता-पायाला जबर दुखापत झाली. घटनास्थळावरून दोघांना तात्काळ भुसावळ येथे गिरजा हॉस्पिटल व नंतर खाजगी रूग्णालयात उपचार्थ दाखल करण्यात आले. मात्र उपचारापुर्वीचं तृप्ती राणे यांचा मृत्यू झाला. तृप्ती राणे यांचा मृतदेह यावल ग्रामिण रूग्णालयात आणण्यात आला. वैद्यकिय अधिकारी डॉ.पी. बी. बारेला यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले.या अपघात प्रकरणी फैजपूर पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आलेली आहे. तृप्ती राणे यांच्या अपघाती निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.