टीकेची झोड उठल्यावर भाजपची उपरती

जळगाव (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले खान्देशचे वजनदार नेते एकनाथराव खडसे यांचा फोटो भाजपचे कार्यालय वसंत स्मृती येथून काढून टाकल्यानंतर त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र स्वर्गीय निखील खडसे यांचा फोटो काढण्यात आला होता. मात्र टीकेची झोड उठवू लागल्यावर भाजपला उपरती सुचली आणि रातोरात निखिल खडसे यांचा फोटो आहे त्याच जागी पुन्हा लावण्यात आला.
खडसे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यावर भाजपचे कार्यालय वसंत स्मृती तेथून त्यांचा जुना फोटो काढून टाकला अशी बातमी केसरीराजने सर्वप्रथम जनतेसमोर आणली होती. त्यानंतर निखिल खडसे यांचाही एक फोटो काढून टाकल्याचे दिसून आले होते. नाथ फौंडेशनचे कार्यकर्ते यांनी लक्ष वेधून घेतल्यावर आणि सर्वत्र सोशल मीडियामधून ट्रोल झाल्यावर भाजपवर सर्वत्र टीका होऊ लागली. या टीकेचा सूर पाहता भाजपने सावध पावले उचलली आणि भाजपतील एका सूत्रांच्या म्हणण्यानुसार, जिल्हाध्यक्षांच्या आदेशाने रातोरात निखिल खडसे यांचा फोटो पुन्हा एकदा भाजप कार्यालय येथे लावण्यात आला. निखिल खडसे यांच्या पत्नी खा. रक्षाताई खडसे या भाजपच्या विद्यमान खासदार आहेत व त्या अजूनही भाजपमध्ये आहेत. त्यामुळे खासदारांची नाराजी ओढवू नये यासाठी हा फोटो परत जागच्या जागी लावण्यात आला आहे.







