सीईओ डॉ.पाटील यांचे आदेश

जळगाव (प्रतिनिधी) – पाचोरा तालुक्यातील बाळद ग्रामपंचायतीने १४ व्या वित्त आयोगाच्या निधीत तसेच ग्रामपंचायतींच्या मालकीच्या गाळ्यांची विक्रीत अपहार केल्याची तक्रार जि.प.सदस्य रावसाहेब पाटील यांनी केली होती. तक्रारीनंतर चौकशी करण्यात आली असता यात सरपंच व ग्रामसेवकांनी अपहार केल्याचे उघड झाल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील यांनी संबंधित सरपंच व ग्रामसेवकांवर गुन्हा दाखल करून अपहाराची रक्कम वसूल करण्याचे आदेश दिले आहे.
जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील यांनी १४ व्या वित्त आयोगाच्या निधीत आणि ग्रामपंचायतीच्या गाळ्यांच्या विक्रीचा मुद्दा जि.प.च्या स्थायी तसेच सर्वसाधारण सभेत उपस्थित केला होता. त्यानुसार चौकशी करण्यात आली. रावेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांची याप्रकरणी चौकशीसाठी नेमणूक करण्यात आली होती. त्यांनी चौकशी करून अहवाल सादर केला. यात सरपंच इंदूबाई भगवान निकम व ग्रामविकास अधिकारी श्रावण मोतीराम पाटील यांनी गंभीर स्वरूपाच्या अनियमितता केलेल्या आहेत. त्यांच्याविरुद्ध प्रचलित कायद्यानुसार कारवाई करण्याविषयी सूचित करण्यात आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पाटील यांनी, दोषी असलेल्यांकडून अपहाराबाबत वसुली करावी व त्यांच्यावर तत्काळ गुन्हे दाखल करावेत व त्याचा अहवाल सादर करावा असे म्हटले आहे.







