चाळीसगाव (प्रतिनिधी) – राजकारणही कुस्ती सारखाच खेळ असून धोबीपछाडसह सर्व डावपेच आपल्याला माहिती आहे. कोणाला आत घ्यायचे, कोणाला बाजूला करायचे व कोणाला बाहेर काढायचे हे आपणास चांगलेच माहीत आहे. मीही राजकारणातील कुस्तीपटू आहे. जगातील युवा देश म्हणून भारताची ओळख आहे. परंतु देशातील युवा पिढी व्यसनांकडे वळत आहे. निरोगी शरीर हे निरोगी देशाची गरज आहे. तरुणांनी व्यसनांकडे न वळता आपला खरा पुरूषार्थ व्यायाम शाळेत दाखवावा, असे आवाहन या आमदार गिरीश महाजन यांनी केले.

चाळीसगावात उभारण्यात येणार्या आण्णासाहेब कोळी पैलवान व्यायाम शाळेचे भूमिपूजन माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी खा. उन्मेष पाटील, आ. मंगेश चव्हाण, माजी आमदार साहेबराव घोडे, रमेश पाटील, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख उमेश गुंजाळ, नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांच्यासह पालिकेतील नगरसेवक व अन्य पदाधिकारी यांच्यासह कुस्तीपटू उपस्थित होते. याप्रसंगी आ. गिरीश महाजन यांनी जोरदार फटकेबाजी केली. ते म्हणाले की, राजकीय जीवनात वावरतांना कबड्डीसह सहा खेळ खेळलो आहे. त्यामुळे कुस्ती खेळात मी चांगलाच पारंगत आहे.







