मुंबई (वृत्तसंस्था) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. वाढीव वीज बिल आणि शेतकऱ्यांच्या दूध दराच्या मुद्द्यावर राज ठाकरे यांनी राज्यपाल महोदयांना एक निवेदनही दिलं आहे. त्यावेळी राज्यपालांनी राज ठाकरे यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी बोलण्याचा सल्ला दिल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं. त्यानंतर आज राज ठाकरे आणि शरद पवार यांच्यात फोनवर चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. यावेळी राज्यपाल भेटीबाबत राज ठाकरे आणि पवार यांच्यात चर्चा झाल्याचं समजतंय.

‘जिथे 2 हजार वीज बिलं येत होती तिथे लोकांना 10 हजार बिलं आता येत आहेत. त्यासाठी पहिलं निवेदन राज्यपालांना दिलं आहे. कुठली गोष्ट सांगितल्यावर काम चालू आहे, असं सांगितलं जातं, पण त्यावर निर्णय होत नाही. ही पाच पट, सहा पट बिलं बेरोजगारांनी कुठून भरावीत ते सांगा. लवकरात लवकर निर्णय होईल, अशी आशा असल्याचंही राज ठाकरे राज्यपालांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना म्हणाले.
राज्यात प्रश्न खूप आहेत. प्रश्नांची कमतरता नाही. कमतरता आहे ती फक्त निर्णय घेण्याची असं सांगतानाच निर्णय का घेतले जात नाहीत? कशासाठी हे सरकार कुंथत आहे? कुंथत कुंथत सरकार चालवता येत नाही, अशा शब्दात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यपालांच्या भेटीनंतर ठाकरे सरकारवर टीका केली.







