नवी दिल्ली (प्रतिनिधी) – नागरी उड्डाण महासंचालनालयाने आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील निर्बंध 30 नोव्हेंबर पर्यंत कायम ठेवले आहेत. दरम्यान, आंतरराष्ट्रीय ऑल कार्गो फ्लाईट्स आणि नागरी उड्डाण महासंचालनालयाकडून मान्यता देण्यात आलेल्या फ्लाईट्सवर ही बंदी नसेल. कोविड-19 संकटात घालण्यात आलेल्या निर्बंधात आता 30 नोव्हेंबर पर्यंत वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी सप्टेंबर महिन्यात या निर्बंधात 31 ऑक्टोबर पर्यंत वाढ करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा ही मूदत वाढवून 30 नोव्हेंबर करण्यात आली आहे.

भारताने तब्बल 18 देशांसबोत प्रवासाचा आरखडा आखला आहे. त्याअंतर्गत दर आठवड्याला प्रत्येक देशातून भारतात मोजक्याच फ्लाईट्स येऊ शकतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात नागरी उड्डाण महासंचालनालयाने 12,983 देशांतर्गत विमान उड्डाणांना परवानगी दिली आहे. ही विमान उड्डाणे 25 ऑक्टोबर 2020 पासून 27 मार्च 2021 या कालावधीत होतील. कोविड-19 संकटात देण्यात आलेल्या परवानग्यांपेक्षा या 55 अधिक परवानग्या आहेत.
दरम्यान, आरोग्य मंत्रालयाच्या लेटेस्ट अपडेट्सनुसार, भारतातील कोरोना बाधितांचा आकडा 80 लाखांच्या जवळ पोहचला आहे. त्यापैकी 72,59,510 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून 6,10,803 सक्रीय रुग्ण आहेत. तर आतापर्यंत तब्बल 1,20,010 रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाचे संकट कायम असले तरी अनलॉकिंगच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने बंद करण्यात आलेल्या सेवा पुन्हा सुरु करण्यात येत आहेत. परंतु, विमान उड्डाणांवरील निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत.







