मुंबई (वृत्तसंस्था) – मुंबईत म्हणजेच एनसीबीने मोठं ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत एनसीबीची धडक कारवाई सुरू आहे. सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यू नंतर ड्रग्जचं प्रकरण बाहेर आलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा या विषयाची चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर एनसीबीने अंमली पदार्थांचा व्यापार करणारे अनेक रॅकेट्स उद्ध्वस्त केले आहेत. एनसीबीने मुंबईतल्या डोंगरी भागात ही कारवाई केली असून अखलाक अहमद अब्दुल अन्सारी या तस्कराला अटक केली आहे.

या तस्कराकडे MD ड्रग्ज सापडलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत 30 लाख एवढी आहे. अन्सारी विरुद्ध या आधीही गुन्हे नोंदवलेल असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
एनसीबीने मंगळवारी केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणावर गांजा जप्त केला होता. कतारहून एका जहाजामध्ये हा माल येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. अन्सारीच्या अटकेनंतर महत्त्वाची माहिती उघड होण्याची शक्यता आहे. अन्सारी हा आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करीतला एक मोहोरा असून त्याच्या मागे मोठं रॅकेट असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर ड्रग्ज अँगलच्या तपासात बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन समोर आलं. आता या प्रकरणाला एक वेगळंच वळण मिळतं आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाशच्या घरीच ड्रग्ज सापडले आहेत.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रिया चक्रवर्ती प्रकरणात ड्रग्ज पेडलर्सची चौकशी करण्यात आली होती. रिया प्रकरणात अटक करण्यात आलेल्या ड्रग्ज पेडलर्सच्या चौकशीत करिश्मा प्रकाशचंही नाव समोर आलं. ती या ड्रग्ज पेडलर्सच्या सातत्याने संपर्कात होती, असं उघड झालं. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं तिच्या घरावर छापा टाकला. तेव्हा तिच्या घरात ड्रग्ज सापडले आहेत. तिच्या घरातून 1.8 ग्रॅम चरस जप्त करण्यात आला आहे.







