मुंबई (वृत्तसंस्था) – राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांना करोनाची लागण झाली आहे. यासंदर्भातील माहिती त्यांनी स्वतः ट्विटरवरून दिली आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईच्या रुग्णालयात दाखल झाल्याचे सांगितले आहे.
सुनील तटकरे म्हणाले कि, काल माझी करोना चाचणी करण्यात आली असून, आज त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. माझी प्रकृती उत्तम असून खबरदारीचा उपाय म्हणून मी मुंबईतील रुग्णालयात दाखल झालो आहे. आपल्या सर्वांच्या सदिच्छा व आशीर्वाद यांच्या बळावर मी लवकरात लवकर पुन्हा आपल्या सेवेत रुजू होईन, असे त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना करोनाची बाधा झाल्याने मुंबईतील ब्रिच कॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. खुद्द पवार यांनीच याची माहिती समाज माध्यामांद्वारे दिली आहे.
गेल्या काही महिन्यांत राज्यातील सुमारे एक डझन मंत्र्यांना करोनाची बाधा झाली होती. त्यात जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण, धनंजय मुंडे, वर्षा गायकवाड, एकनाथ शिंदे आणि नितीन राऊत आदी महत्त्वाच्या मंत्र्यांचा समावेश होता.







