बीड (वृत्तसंस्था) – ऑनलाईन दसरा मेळावा घेणाऱ्या पंकजा मुंडेंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस स्टेशनमध्ये 40 ते 50 जणांविरोधात आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंकजा मुंडे यांच्यासह महादेव जानकर, खासदार भागवत कराड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंकजा मुंडे यांनी सावरगावमध्ये ऑनलाईन दसरा मेळावा घेतला होता. या मेळाव्यासाठी कोणीही हजर राहू नये, असं आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं होतं. त्यामुळे गावातील लोकांशिवाय बाहेरचे कुणी फारसे लोक या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत. मात्र पंकजा मुंडे यांच्यासोबत उपस्थित असलेल्या लोकांनी कोणतंही सोशल डिस्टन्स पाळलं नाही. आपत्ती व्यवस्थापना संदर्भात घालून दिलेल्या नियमांचे पालन त्यांनी केले नाही.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये पाथर्डीच्या आमदार मोनिका राजुरे, जिंतूरच्या मेघना बोर्डीकर, भीमराव धोंडे, सविता गोल्हार, विजय गोल्हार, सुवर्णा लांबरुड, संदेश सानप, राजेंद्र सानप, राजाभाऊ मुंडे आणि अन्य 40-50 जणांचा समावेश आहे.