जळगाव (प्रतिनिधी) – महसूलमंत्री बाळासाहेब उर्फ विजय थोरात यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जळगाव जिल्हा जागृत जनमंचतर्फे सोमवारी 26 ऑक्टोबर रोजी धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, कोणतीही तक्रार नसलेल्या व कार्यकाळ पूर्ण न झालेल्या चाळीस अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्या बदल्या महसूलमंत्री थोरात यांनी केल्या. या बदल्या नागपूर मेट हायकोर्टाने बेकायदेशीर ठरवल्या. वैयक्तिक स्वार्थासाठी कायद्याचे उल्लंघन महसूल मंत्र्यांनी केले आहे. तसेच जळगाव तहसीलदार वैशाली हिंगे यांनी 19 लाख 57 हजार रुपयांचा नजराणा बुडविला. तरीदेखील त्यांच्याकडून कुठलीही वसुली केली नाही. भडगाव तहसीलदार माधुरी आंधळे यांच्याकडून शेत पाणंद रस्त्यांच्या निधी 33 लाख रुपयांचा अपहार झाला तरी त्यांच्यावर कारवाई केली नाही. बोगस परमिट देणाऱ्या अधिकाऱ्यांकडून रॉयल्टीची रक्कम वसुली केली नाही. त्यांची बदली देखील केली नाही. बाळासाहेब थोरात यांनी एका वर्षात महसूल खात्यामध्ये कोणतेही विधायक काम केले नाही. मंत्री पदाचा उपयोग वैयक्तिक स्वार्थासाठी थोरात करीत आहेत. मंत्री असून देखील ते स्वतःच्या वाहनाचा उपयोग काँग्रेस पक्षाच्या कामासाठी करतात असा आरोप करीत जळगाव जागृत जनमंचतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. धरणे आंदोलनामध्ये शिवराम पाटील, दीपक कुमार गुप्ता, डॉ. सरोज पाटील, विजय पाटील यांनी सहभाग घेतला.







