जळगाव (प्रतिनिधी) – येथील एमआयडीसी परिसरात असलेल्या एका कंपनीत दुचाकीने कामावर जात असतांना उमाळे फाट्याजवळ समोरून येणाऱ्या ट्रकच्या जोरदार धडकेत ६५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी 26 रोजी सकाळी घडली.
कामगार डिगंबर सोनू नेमाडे (वय-६५, रा. गजानन नगर, काशिनाथ लॉजजवळ) हे एमआयडीसीतील भाग्यश्री प्लास्टिक कंपनीत कामाला आहे. नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास कंपनीत कामाला जात असतांना चिंचोली-उमाळे गावादरम्यान राधाकृष्ण लॉन जवळ समोरून येणाऱ्या ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. त्याचे मित्र भगवान सुकलाल निकम यांनी तातडीने जखमी डिगंबर नेमाडे यांना शहरातील खासगी रूग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना गुलाबराव देवकर वैद्यकिय महाविद्यालयात रवाना केले. उपचारांती वैद्यकिय अधिकारी डॉ. सचिन अहिरे यांनी दिगंबर नेमाडे यांना मयत घोषीत केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. एमआयडीसी पोलीसांनी ट्रक ताब्यात घेतले असून चालकास अटक करण्यात आली आहे. प्राथमिक तपास एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सपोनि संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ. संतोष पवार, संदीप धनगर करीत आहे.
डिगंबर नेमाडे हे जळगावात एकटे राहत होते. १ वर्षापुर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते. त्यांच्या पश्चात गिरीष आणि मनोज हे दोन मुले असून दोन्ही नोकरीच्या निमित्ताने नाशिक आणि पुणे येथे स्थायिक झाले असल्याची माहिती मिळाली.







