जळगाव (प्रतिनिधी) – तहसीलदारांच्या महसूल पथकाने जप्त केलेले अवैध वाळू वाहतुकीचे डंपर सोडवायला लावल्याच्या संशयावरून येथील जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी संदीप शाळीग्राम पाटील यांना पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी शनिवार दि. २४ रोजी निलंबित केले आहे.

शहरातील पांडे डेअरी चौकात तहसीलदारांचे महसूल विभागाचे पथक अवैध वाळू वाहतुकीविषयी कारवाई करीत होते. त्यावेळी वाळूने भरलेले डंपर (क्रमांक – एम. एच. १९, सी. वाय. ३६०७) अवैध वाहतूक करीत असल्याच्या संशयावरून पथकाने पकडले. डंपर चालकाने मालकाला माहिती दिली. माहिती मिळताच जिल्हापेठ पोलीस स्टेशनचा कर्मचारी संदीप पाटील हा घटनास्थळी आला. त्याने डंपर सोडविण्यासाठी पथकाला सांगितले. मात्र, पथकाने पोलिसाला न जुमानता डंपर थेट जिल्हापेठ पोलीस ठाण्यात जमा केले. याबाबत पोलीस अधीक्षक डॉ. मुंढे यांनी चौकशी करून अहवाल मागितला होता. त्यानुसार शनिवारी २४ रोजी त्याला डॉ. मुंढे यांनी निलंबित केले आहे. डंपर मालक लोकेश महाजन याला तलाठ्यांनी २ लाख,३९ हजार रुपये दंडाची नोटीस बजावली असल्याची माहिती मिळत आहे.







