एकनाथराव खडसेंचा इशारा, शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत झाला प्रवेश

जळगाव (प्रतिनिधी)- माजी मंत्री महाराष्ट्रातील भाजपचे वजनदार नेते एकनाथराव खडसे यांनी शुक्रवारी दि. २३ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता भाजपाला सोडचिठ्ठी देत, चार दशकांची साथ सोडत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत ७२ कार्यकर्त्यांसह जोरदार प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खडसे यांच्या गळ्यात राष्ट्रवादीचा गमछा घालून प्रवेश दिला. यावेळी खडसे यांनी, माझ्यामागे जर ” ईडी ” लावली तर मी “सीडी” लावेल.” अशा शब्दात त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करीत भाजपाला अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. काही दिवस जाऊ द्या, कोणी किती भूखंड घेतला ते मी सांगेल, असेही खडसेंनी सांगितल्यामुळे त्यांची भविष्यातील आक्रमकता स्पष्ट झाली आहे. त्यांच्या प्रवेशामुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले असून भाजपाला सर्वात पहिला फटका हा बालेकिल्ला असलेला उत्तर महाराष्ट्रात आगामी काळात बसणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे.
यावेळी मंचावरती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, एकनाथराव खडसे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख, मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, राजेंद्र शिंगणे, जितेंद्र आव्हाड, आदिती तटकरे, खा. सुप्रियाताई सुळे, सुनील तटकरे, माजी खा. प्रफुल्ल पटेल यांच्यासह माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजीमंत्री गुलाबराव देवकर, अमळनेरचे आ. अनिल पाटील, माजी आ. दिलीप सोनवणे, माजी आ. संतोष चौधरी, माजी आ. दिलीप वाघ, माजी आ. दिलीप गोटे, संजय गरुड, नाशिकचे हेमंत टकले, जळगावचे माजी जिल्हाध्यक्ष गफ्फार मलिक, शहराध्यक्ष आभिषेक पाटील आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन जळगाव जिल्ह्याचे राष्टवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी केले.
यावेळी अरुणभाई गुजराथी म्हणाले की, खान्देशात नव्हे तर उत्तर महाराष्ट्रात हजारो लोकांना ज्यांनी न्याय मिळवून दिला त्याच नाथाभाऊंवर भाजपमध्ये मोठा अन्याय झाला. उत्तर महाराष्ट्रात खडसे हे नाथाभाऊ म्हणून प्रसिद्ध आहे. नाथाभाऊ यांना विकासाची दृष्टी असून, मातीतला माणूस, प्रशासनावर वचक असणारा माणूस आहे. खडसे राष्ट्रवादीत आले याचा आनंद आहे. पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली तुम्ही नक्की मोठे व्हाल.
तुम्ही ३ ते ४ दशके राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून दिला नाही. आता जिल्ह्यात १० ते १२ उमेदवार निवडून आणा. असा चिंमटा देखील गुजराथी यांनी काढला. खडसेंना मानणारा वर्ग धुळे, नंदुरबार, जळगाव, मलकापूर येथे आहे असेही ते म्हणाले.
जयंत पाटील यावेळी म्हणाले की एकनाथराव खडसे यांना कट कारस्थान करून बाजूला सारण्यात आले असले तरी त्यांनी दाखवून दिले की ‘टायगर अभी जिंदा है’ अशा शब्दांमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज पक्षप्रवेश कार्यक्रमात स्तुतीसुमने उधळली.एकनाथराव खडसे यांच्यासह 1990 साली विधानसभेत प्रवेश केला. याप्रसंगी त्यांनी एक विधानसभा सदस्य किती चांगल्या पद्धतीने काम करू शकतो हे दाखवून दिले. त्यानंतर त्यांचे सरकार आल्यानंतर अतिशय कार्यक्षम मंत्री म्हणून त्यांची कारकीर्द राहिली. तर प्रदीर्घ काळ विरोधात राहून त्यांनी एक सक्षम विरोधी नेता कसा असतो हे दाखवून दिले. आणि सरकार आल्यानंतर त्यांच्याविरुद्ध कट कारस्थान करून त्यांना बाजूला सारण्यात आले. या प्रसंगी आपण एकनाथराव खडसे यांच्या बाजूने खूप बोललो. एकदा आपण विधानसभेत प्रश्न विचारला होता की कटप्पा ने बाहुबली बबली को क्यू मारा या प्रश्नाचे उत्तर आजही मिळालेले नाही. अर्थात उत्तर मिळाले नसले तरी एकनाथराव खडसे यांनी दाखवून दिले की, ‘टायगर अभी जिंदा है आणि हो पिक्चर अभी बाकी है’ असे सांगत त्यांनी एकनाथराव खडसे यांच्या कार्याचा गौरव केला.
यानंतर एकनाथराव खडसे यांनी सांगितले की, “मी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला तेव्हा जयंत पाटील यांनी मला भाजप तुमच्या मागे ईडी लावतील असे म्हटले, तेंव्हा मी त्यांना भाजपने जर माझ्या मागे ईडी लावेले तर मी त्यांच्या मागे ईडी लावेल” असे म्हटले. जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्ष दुप्पटीने वाढवेल असा शब्द यावेळी खडसे यांनी शरद पवार यांना दिला. चार दशके काढल्यामुळे एकाएकी पक्ष सोडू वाटलं नाही. माझी मानहानी झाली. माझा गैरव्यवहार असेल तर, कागदपत्रे द्या. मात्र, अझून मला उत्तर मिळालेले नाही. संघर्ष माझा स्थायीभाव असून खूप संघर्ष केला पण विद्वेषाची भाषा कधी केली नाही. कोणाच्या पाठी कधीही खंजीर खुपसला नाही. एका महिलेला समोर करून राजकारण करण्यात आले. मी लेचापेचा नाही. ते म्हणतात की, पक्षाने तुम्हाला खूपकाही दिले. पण मी म्हणालो की, नाथाभाऊंनी उभी हयात दिली त्याचे काय? मात्र, माझ्या मागे एसीबी, इन्कम टॅक्स, महिला मागे लावली. आता मी, दुप्पट वेगाने ” एनसीपी ” चे कार्यकर्ते वाढवेल. असे त्यांनी निर्धारपूर्वक सांगितले.
जळगावचे सागर पार्क ओतप्रोत भरेल. एवढे कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊ असे त्यांनी स्पष्ट केले.







