जळगाव (प्रतिनिधी) किरकोळ कारणावरून दोन गटात बेदम मारहाण करून गुप्ती आणि लोखंडी पट्टीने वार करण्यात आल्याची घटना मेहरूण परिसरातील दर्गाजवळ घडली. यात दोन जण जखमी झाले असून चार जणांना एमआयडीसी पोलिसानी अटक केली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात परस्परविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जुबेर यासीम खाटीक (वय-३६) रा. पोलीस कॉलनी, सुप्रिम कॉलनी जळगाव हे रिक्षाचालक २२ ऑक्टोबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ते मित्र अशरफ शहा रा. सुप्रिम कॉलनी हे दोघे जहारत साठी दर्गावर गेले होते. त्यावेळी जावेद शेख हा त्याच्या कुटुंबियासह दुचाकीने जहारत साठी आले होते. जावेदने दुचाकीचा रेस वाढवून जोरजोरात आवाज केला. यावर जुबेरने आवाज न करण्याचे सांगितल्यानंतर रागाने बाहेर जावून जावेद शेखने मित्र शोयब शेख सलीम, अमर महबुब तडवी, समिन शेख जावेद शेख यांना घेवून आला. यातील शोएब गुप्ती काढून जुबेरवर सपासप वार केले. तर इतरांनी दगड उचलून फेकून मारले. यात शोएब जखमी झाला. हा प्रकार घडल्यानंतर जुबेर सोबत असलेले अशरफ शहा यांनी सोडवासोडव केली. त्यानंतर संशयित आरोपी जावेद व त्यांचे मित्र घटनास्थळाहून पसार झाले. जुबेर खाटीक यांच्या फिर्यादीवरून जावेद शेख, शोयब शेख सलीम, अमर महबुब तडवी, समिन शेख जावेद शेख यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या फिर्यादीत म्हटले आहे की, मोहम्मद शोएब शेख सलीम (वय-२०, रा. बिलाल चौक तांबापूरा) हे २२ ऑक्टोबर रोजी मित्र अमल तडवी, मेहबुब तडवी, शब्बीर खान जावेद खान असे मेहरूणमधील दर्गावर जहारतसाठी गेले असता त्याठिकाणी जुबेर खाटीक हा शोएबच्या आत्याशी भांडण करत होता. दोघांचे भांडण सोडविण्यासाठी शोएब मित्रांसह गेल्याचे याचा राग जुबेरला आला. जुबेरने हातातील लोखंडी पट्टी शोएबच्या हातावर मारून जखमी केले. तसेच जुबेरसह अहमद शाहा डबुशाह, जुबेरचा भाऊ, शाब्बीर खाटीक, गुलाब खाटीक अशांनी मारहाण केली. शोएबच्या फिर्यादीवरून जुबेरसह इतर तिन जणांवर एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटना घडल्यानंतर एमआयडीसी पोलीसात परस्परविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्या नंतर एमआयडीसी पोलीसांनी दोन्ही गटातील संशयित आरोपी जावेद शेख भिकन (वय-२६), मोहम्मद शोयब तडवी शेख सलीम (वय-२०), अमर मेहबुब तडवी (वय-१९) आणि समिर शेख जावेद शेख (वय-१९) सर्व रा. तांबापूरा या चौघांना मध्यरात्री अटक करण्यात आली आहे. आज चौघांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस करीत आहे.