जळगाव (प्रतिनिधी) – महानगर पालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीत माजी मंत्री गिरीश महाजन यांचा करिष्मा दिसून आला असून सभापती पदी भाजपचे उमेदवार राजेंद्र घुगे पाटील हे विजयी झाले आहेत. यामुळे खडसे समर्थकांचा हिरमोड झाल्याचे दिसून आले.
मनपाच्या स्थायी समिती सभापतींच्या निवडणुकीत नवनाथ दारकुंडे, राजेंद्र घुगे पाटील, ललित कोल्हे असे तीन उमेदवार इच्छुक होते. पक्ष देईल तो निर्णय तिघांनाही मान्य होता. अंतिम क्षणी पक्षाचे नेतृत्व असलेले माजी मंत्री गिरीश महाजन यांनी तिघेही उमेदवारांची योग्य चाचपणी केली त्यातून मागीलवर्षी शर्यतीत असलेले राजेंद्र घुगे पाटील यांचे नाव सभापती पदासाठी निश्चित केले. सभापती पदासाठी सेनेचे नितीन बर्डे यांनीदेखील अर्ज भरला होता. मात्र, केवळ तीन सदस्यांच्या बळावर सभापती होऊ शकत नाही हे समजल्याने त्यांच्या उमेदवाराने माघार घेतली. तसेच खडसे समर्थकांनी देखील प्रयत्न करून देखील ते तोंडघशी पडले. अखेरपर्यंत माजी मंत्री गिरीश महाजन यांचा करिष्मा आणि त्यांच्यवर विश्वास ठेवून स्थायी समितीचे भाजपचे १२ ही नगरसेवक शेवटपर्यंत अभेद्य राहून भाजपा उमेदवारांच्या पाठीशी राहिले. त्यामुळे भाजपाचे घुगे पाटील विजयी झाले.








