खडसेंचे होणारे पक्षांतर भाजपसाठी ठरली डोकेदुखी

जळगाव (प्रतिनिधी) – स्थायी समिती सभापतीपदासाठी गुरुवारी 22 ऑक्टोबर रोजी राजेंद्र घुगे पाटील यांची निवड झाली. ऐनवेळी सेनेचे उमेदवार नितीन बरडे यांनी माघार घेतल्यामुळे घुगे पाटील यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला. मात्र स्थायी समिती सभापतीपदाची ही निवडणूक यावेळी चर्चेची व भाजपासाठी प्रतिष्ठेची ठरली. एकनाथराव खडसे यांचे उद्या होणारे पक्षांतर मागील 24 तास भाजपसाठी डोकेदुखी ठरले.
या निवडणुकीसाठी भाजपकडून घुगे पाटील यांच्यासह ललित कोल्हे, नवनाथ दारकुंडे हे इच्छुक होते. अगदी शेवटच्या क्षणी भाजपच्या नेतृत्वाने घुगे पाटील यांचे नाव अंतिम केले. त्यानंतर देखील महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. बुधवारी सकाळी आधी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यानंतर एकनाथराव खडसे यांनी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले. यानंतर मात्र आक्रमक घडामोडींना मनपात वेग आला. यात भाजपचे स्थायी समितीमधील 12 नगरसेवक फुटून बरडे यांना साथ देतील अशी स्थिती निर्माण झाली होती. एकनाथराव खडसे यांच्या प्रभावामुळे स्थायी समिती सभापतीच्या निवडणुकीत काहीही घडू शकते, या धास्तीमुळे भाजपने देखील नगरसेवकांना व्हीप जारी केला होता. तसेच दिवसभर स्थायी समितीच्या बारा नगरसेवकांवर पक्ष नेतृत्व लक्ष ठेवून होते. भाजपचा उमेदवार पाटील हे निवडून यावे यासाठी भाजपसाठी पुढील 24 तास महत्वाची आणि कसोटी पाहणारी ठरली.
अखेर गुरुवारी 22 रोजी सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी लढा फार्म हाऊस येथे झालेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये नितीन बरडे यांनी माघार घ्यावी असे ठरले. या बैठकीत नेमके काय घडले हे खूप महत्वाचे होते. बैठकीमध्ये आ. राजूमामा भोळे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, भाजपचे गटनेते भगत बालाणी, उप गटनेते तथा उमेदवार राजेंद्र घुगे पाटील यांच्यासह काही भाजपाचे नगरसेवक सोबत शिवसेनेचे विरोधी पक्षनेते सुनील महाजन, ज्येष्ठ नगरसेवक तथा माजी महापौर नितीन लढ्ढा, सेनेचे उमेदवार नितीन बरडे यांच्यासह सेनेचे काही नगरसेवक उपस्थित होते. बैठकीमध्ये आमदार भोळे यांनी शहराच्या विकासासाठी बरडे यांनी माघार घ्यावी अशी विनंती केली. मात्र शहराचा विकास करीत असताना सेनेला डावलले जाऊ नये. समान निधी समान वाटप या तत्त्वानुसार शिवसेनेच्या प्रभागांमध्ये देखील विकास कामे करीत असताना भाजपच्या नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये ज्या पद्धतीने निधी वाटप आणि सहकार्य केले जाते तसेच सहकार्य सेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागात देखील केले जावे अशी मागणी यावेळी शिवसेनेकडून करण्यात आली. शेवटी विकासाच्या मुद्द्यावर दोघी पक्षांमध्ये समन्वय होऊन बरडे यांनी माघार घेण्याचे ठरले.
नितीन बरडे यांची माघार मात्र चर्चेचा विषय ठरत आहे.







