भाजपाचे वैद्यकीय आघाडीचे डॉ. तुषार संनंसे यांचा राजीनामा

तळोदा / जळगाव (प्रतिनिधी) – भाजपाचे वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र संयोजक डॉ.तुषार संनंसे यांनी देखिल भाजप सद्स्यत्वाचा राजीनामा दिला आहे. खडसे यांच्या राजीनाम्यांनंतर उत्तर महाराष्ट्रात भाजपला मोठं भगदाड पडण्याचे चिन्ह दिसून येत आहे.
निष्ठावान व जुन्या कार्यकर्त्यांना डावलून बाहेरून पक्षात आलेल्याना पद दिल्याचा आरोप करत स्थानिक तसेच प्रदेश नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करून चर्चेत आलेले डॉ. तुषार संनंसे हे एकनाथ खडसे यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जातात. नंदुरबार जिल्हा भाजपात असणाऱ्या गटबाजी विरोधात त्यांनी वेळोवेळी भाष्य केले होते व जिल्ह्यातील जुन्या व निष्ठावंत कार्यकर्त्यांची नाराजी प्रदेश पातळीवर पोहचवली होती.त्यांनी वेळीवेळी याबाबत वाच्यता केल्यामुळे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांना पत्र पाठवून या बाबी पक्ष विरोधात असल्याचे त्याच्याकडून खुलासा मागवला होता.
या पार्श्वभूमीवर त्यांनी डॉ. तुषार संनंसे व खा. हिना गावित यांना मुंबई येथे बाजू मांडण्यासाठी मुंबई येथे प्रदेश कार्यालय येथे बोलावले होते. मला लोकनेते एकनाथ खडसे यांचा कार्यकर्ता म्हणून जर माझ्यावर कारवाई होत असेल तर मीच भारतीय जनता पार्टीला जाहीर जय श्री राम करतो, पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्याची घुसमट व अन्यायाच्या विरोधात जिल्ह्यातील बरेच कार्यकर्ते पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. पक्षात सध्या हुकूमशाही व दाबून मारण्याचे प्रकार सुरू आहेत त्यामुळे मी भारतीय जनता पार्टीचा राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे.







