भाजपा बसणार जोरदार हादरे ?

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहर महानगरपालिकेत सध्या भाजपाची एकहाती सत्ता आहे. तरीदेखील गट तटाने पोखरले गेल्यामुळे भाजपाला स्वकियांचाच सामना करावा लागत आहे. पक्षांतर्गत बंड शमविण्याचे आव्हान असतानाच दुसरीकडे एकनाथराव खडसेंचे पक्षांतर जवळ आल्यामुळे भाजपात धडधड वाढली आहे. हे पक्षांतर महापालिकेत सत्तांतर घडवून आणेल या दृष्टीने व्यूहरचना आखली जात असल्याची खात्रीशीर धक्कादायक माहिती समोर येत असल्याने नेहमीप्रमाणे भाजप परत विरोधी बाकांवर बसेल काय हे पुढील काळात पाहणे रंजक ठरणार आहे. यासह जिल्हा परिषदेत देखील १६ ते १८ सदस्यांचा गट नाथाभाऊंच्या समर्थनार्थ बाहेर पडणार असल्याची चर्चा असून येथील भाजपच्या सत्तेलादेखील मोठा फटका बसणार आहे.
महापालिकेत स्थायी समिती सभापती पदाच्या उमेदवाराची २२ ऑक्टोबर रोजी निवड होणार आहे. मात्र सभापतीपदासाठी प्रचंड रस्सीखेच सुरु आहे. त्यातच माजी महापौर ललित कोल्हे, मागील वर्षी प्रतीक्षेत असलेले विजय घुगे पाटील, नवनाथ दारकुंडे यांच्यात जबरदस्त चुरस सुरु आहे. त्यासाठी भाजपचेच काही नगरसेवक आता गटबाजी करीत आहेत.
खडसेंच्या सोबत जायचे आणि अपात्र व्हायचे नाही त्यासाठी स्वतंत्र गट स्थापन करावा अशी सूचना नगरसेवकांना मिळाल्याची माहिती आहे. भाजपचे सुमारे ३२ जणांचा स्वतंत्र गट तयार करून सोबत, गरज पडल्यास सेनेची मदत घेऊन सत्ता स्थापन करण्याचे देखील मनसुबे खडसे समर्थकांचे आहेत. विरोधी पक्षात बसून आता शिवसेना कंटाळला असून त्यांच्या विरोधाची धार बोथट झाल्याचे दिसून येत आहे. आगामी काळात मनपातील राजकीय घडामोडी वेगवान होत असून राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.
यासोबत जिल्हा परिषदेत भाजपचे ३४ सदस्य असून त्यातील जिल्ह्याच्या पूर्व भागातील सुमारे १६ ते १८ सदस्य हे खडसे साहेबांच्या समर्थनासाठी वेगळा गट स्थापन करून सोबत राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षाला घेत सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी देखील चाचपणी सुरु झाल्याचे समजून येत आहे.







